You are currently viewing कोंबडी वडे सोलकढी

कोंबडी वडे सोलकढी

चमचमीत, सोपा आणि सगळ्यांचा आवडता बेत: कोंबडी-वडे-सोलकढी! आई नेहमीच हे वडे चिकन बनवता बनवता आचिर्णेच्या आज्जीची आठवण काढून त्याकाळी कोंबडी-वडे बनवायला कांदा-खोबरे वाटण आणि अख्खे मसाले आज्जी कशी एकटी पाट्या- वरवंट्यावर बारीक वाटत असे, वडे कसे खमंग करत असे हे मलाही सांगत असते. कोंबडी रस्सा किंवा वडा-सागोती देखील म्हणतात ह्याला. आईच्या हातचा हा मेन्यु पण आम्हा सर्वांचा आवडता.

कोकणी कोंबडी-वडे-सोलकढी

वडे:

मधे छिद्र असलेले वडे बहुधा आमच्याकडे केले जातात पण ह्यावेळी पुरीसारखे गोड वडे बनवले होते.

१. एक किलो जाडसर तांदूळ

२. एक वाटी उडीद डाळ

३. अर्धी वाटी चणा डाळ

४. दोन चमचे धणे भाजून

५. पाऊण चमचा मेथी भाजून

वरील सारे साहित्य हलकेच भाजून, थंड झाल्यावर एकत्र करून दळून आणावे. वड्यासाठी पीठ भागवताना, आई त्यात मीठ, हळद, अगदी थोडासा गुळ आणि बारीक चिरलेला कांदा घालते आणि कोमटसर पाणी घालून चांगले मळून घेते. थोडा वेळ उमलू दिले कि वडे थापून तळायचे! छान केशरी-ब्राऊन वडे तयार होतात. हळद नाही टाकली तरी चालते.

————————————————————–

कोंबडी रस्सा/ चिकन रस्सा

आता कोकणी चिकन रस्सा कसा बनवतात आमच्याकडे त्याची पाककृती….

साहित्य लागेल:

१. बारीक चिरलेला एक कांदा

२. दोन ते तीन चमचे रोजच्या वापराचा मालवणी मसाला (मध्यम तिखट आणि मध्यम रंग)

३. गावठी कोंबडी साधारण एक किलो

४. कोथिंबीर (ऐच्छिक)

५. सेलम हळद पावडर

६. मीठ

७. आले लसूण पेस्ट

८. लसूण पाकळ्या ७-८ नग

९. तेल

१०. एक चमचा तीळ+ एक चमचा खसखस भाजून, थंड करून त्यांची पेस्ट

११. दोन हिरवी वेलची, एक मसाला वेलची, तीन-चार तमालपत्र, एक बादियान, दालचिनीचे दोन तुकडे, दोन लवंगा, सात-आठ काळेमिरे हे कढईत भाजून, थंड करून, अगदी बारीक पावडर करा.

१२. पाऊण वाटी कांदा-खोबरे वाटण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून

(कांदा-खोबरे वाटण:

दोन कांदे उभे चिरून घ्या. आणि तेवढेच ओल्या‌ नारळाचे खवलेले खोबरे घ्या. तेलामधे कांदा अगदी मऊसर होईपर्यंत तळून घ्या आणि मग खोबरे टाका. आणि मिक्स करून घ्या. न करपवता पण चांगले खरपूस भाजून घ्या. थोडेसे सुके खोबरे देखील घाला. परतून घ्या. थंड झाल्यावर त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरला लावून अगदी बारीक पेस्ट करा. किंवा घाई असल्यास गॅसवर कांदा आणि सुक्या खोब-याची वाटी भाजून मग वाटण करू शकता.)

आता सुरूवात करूया मस्त कोकणी वडे चिकन बनवायला:

१. गावठी कोंबडीचे चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ, आलेलसूण पेस्ट आणि हळद लावून झाकून ठेवा.

२. एका कढईत तेल गरम करा. लसूण पाकळ्या परतून घ्या. या पाकळ्या कांदा-खोबरे वाटणासोबत मिक्सरमधे बारीक करा.

३. त्याच कढईतल्या तेलात बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. गुलाबीसर छटेचा कांदा झाला कि अख्ख्या मसाल्याची बारीक केलेली पावडर दीड चमचा, तीळ आणि खसखस पेस्ट आणि रोजच्या वापराचा मसाला टाकून छान परतून घ्या. मसाल्याला तेल सुटू लागले की मग मुरवत ठेवलेले चिकन टाकून मोठ्या आचेवर मस्त परता. आच मंद करा.

४. झाकणावर पाणी ठेवून चिकन शिजू द्या. झाकणावरचे पाणी गरम झाले की तेच थोडे थोडे चिकनमधे घालायचे.

साधारण १५-२० मिनिटे मंद आचेवर चिकन शिजू द्या. चिकनच्या अंगच्या पाण्यामधेच शिजत राहते.

५. कांदा-खोबरे वाटण आणि तेलात परतलेल्या लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून थोडे पाणी टाकून अगदी बारीक करून घ्या. हे वाटण चिकनमधे ओतून, हळूहळू परतत एकजीव करा.

६. झाकणावर चे गरम पाणी चिकनमधे ओता. सगळे ढवळून परत झाकणावर वाफेसाठी पाणी ठेऊन चांगले शिजू द्या.

बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. झाले तय्यार घरगुती चविष्ट चिकन… वड्यासोबत खायला उत्तम लागते.

———————————————————

– सोलकढी:

कोकम म्हणजेच आमसुलाची सोलकढी

ही सोलकढी म्हणजे अगदी soulकढी वाटते मला…. ❤️

अगदी आवडीने आणि आवर्जून परत एकदा प्याली जाणारी ही कोकमाची सोलकढी आमच्याकडे मांसाहारी स्वयंपाकादिवशी केली जाते. गुलाबी-पांढरट रंगाची जी-याच्या तडक्याची सोलकढी अगदी भाव खाऊन जाते. सोलकढीची आईची पध्दत सांगते. तशी ही सोलकढी कोकणी खासियत पण आम्ही जेव्हा मटण चिकन बनवतो तेव्हा पाचक म्हणून सोलकढी असतेच.

आपल्याला‌ लागणार आहे:

१. ताजे खवलेले एका नारळाचे खोबरे

२. एक मिरची

३. चार-पाच लसूण पाकळ्या

४. आल्याचा छोटासा तुकडा

५. मीठ

६. चिमुटभर साखर

७. ५-६ कोकम/ आमसुले

८. कोथिंबीर

९. जीरे

१०. तुप

सोलकढी बनवूया चला:

१. आमसुले म्हणजेच कोकमं पाण्यात १ तास भिजत ठेवा. आणि कोकमाचे पाणी पिळून घेऊन कोकम टाकून द्या.

२. मिक्सरमधून ताजे खवलेले नारळाचे खोबरे, जीरे, लसूण पाकळ्या, आले तुकडा,‌ मिरच्या, साखर, मीठ आणि थोडे पाणी घालून फिरवून अगदी बारीक वाटून घ्या.

३. बारीक वाटलेल्या मिश्रणात कोकमाचा रस घालून एकजीव मिसळा आणि सर्व गाळून घ्या.

४. तुप गरम करा. त्यात जीरे फोडणीला टाका.‌आणि ही फोडणी मिश्रणावर टाका आणि ढवळा. बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.

चविष्ट अशी कोकमाची सोलकढी तय्यार! 🌿🙂 ही सोलकढी उत्तम पाचक ही आहे.

गरमागरम भात किंवा जीरा राईस, कोंबडी-वडे, दही-कांदा आणि सोलकढी! जमून येणारा बेत! ❤️🌿

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#chicken#gavathi_chicken#kokani_chicken#kombadi_vade#soulkadhi

Leave a Reply