#पोपटी (सदृश्य)
ह्या महिन्यात हंगामी भाज्या भरपूर प्रमाणात मिळत असल्याने, गुजरात स्पेशल उंधियु झाला, आमच्या पालघर पट्ट्यातील उकडहंडी झाली आणि आता रायगड- अलिबाग ची पोपटी बनवायची खुमखुमी आली. त्यातच अलिबागच्या खास मित्रमंडळीतल्या प्रशांत- प्रिया चा पोपटीचा व्हिडिओ पाहिला आणि तडक पोपटीची रेसिपी प्रियाकडून घेतली. पुडल्याची आयडिया पण प्रियाचीच. चिकन, अंडी, जांभळा कंद, बटाटे, वालाच्या शेंगा, अभी ला आवडतात म्हणून तुरीच्या भरलेल्या शेंगा आणि जाड मीठ- मसाले अशा साध्या जिन्नसामधे मस्त पोपटी तयार केली. चुल किंवा पालापाचोळ्याचा जाळ, तेल-पाणी, केळीची पाने, भांबुर्डी पाला हे आवश्यक.
काल एडवणला पोपटी बनवली. भांबुर्डीचा पाला पोपटी मधे महत्वाचा आहे. त्याने एक विशिष्ट उत्तम चव येते पोपटी तील जिन्नसांना. पण भांबुर्डीचा पाला काही वेळेवर मिळाला नाही मग आमच्याकडे उकडहंडी ला वापरतात तो रान- भेंडीचा पाला मडक्यात भरायला वापरला. पण चांगली झाली एकंदरीत. पुन्हा बनवताना जास्त साग्रसंगीत करणार बरं का! 😸
साधारण खालीलप्रमाणे बनवतात पोपटी… आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या- मसाले वापरता येतात…
चिकन स्वच्छ धुवून त्याला आले-लसूण-मिरची पेस्ट, जाड मीठ (चेचून बारीक केलेले) आणि काळे मिरे पावडर लावून एक तास मुरवत ठेवले. नंतर जरा मसाला लावला.
केळीची पाने शेगडीवर जरा शेकवली म्हणजे मऊ होतात, त्यात चिकनचे २-३ तुकडे ठेऊन ६-७ पुडके धाग्याने बांधून तयार केले.
लहान आकाराचे बटाटे मधे चिरा पाडून, मीठ भरून घेतले. दोन्ही प्रकारच्या शेंगा हळद मीठाच्या पाण्यात जरा थोडा वेळ भिजवून घेतल्या. जांभळ्या कंदाचे तुकडे, धुतलेली अंडी तयार ठेवली. (नुसते मीठ, हळद, मसाला, मिरची पावडर हे वापरूनही उत्तम पोपटी तयार होते. पण मला आवडतात म्हणून काही जास्तीचे मसाले मी वापरले.)
जाड मडके (सिझन केलेले) घेऊन त्यात तेल टाकून सगळीकडे पसरवून घेतले. मग थोड्या शेंगा, मग बटाटे, मग दोन-तीन चिकनचे पुडले, मग थोडे मीठ- हळद- मसाला, काही भेंडीची पाने असे करत कंद, अंडी, परत शेंगा, मीठ-मसाला, चिकनचे पुडले असे थर रचले. थोडा पाण्याचा हबका मारला.
भेंडी आणि केळीच्या पानाने मडक्याचे तोंड बंद केले. शेगडीवर मडके भाजण्यासाठी ठेवले. फिरवत फिरवत सगळ्या बाजूने मडके छान भाजून घेतले. (शेतात ज्वाळ करून मडकी भाजायला टाकताना मात्र, मडक्याचे तोंड आम्ही खाली ठेवतो.) साधारण एक- दीड तासात भांबुर्डीचा पाला असल्यास एक सुंदर दरवळ उठतो. म्हणजे पोपटी झाली. मग मडकी आगीतून अलगद बाजूला काढायची. थोड्या वेळाने केळीच्या पानाने बांधलेले तोंड आणि पाला काढायचा आणि हळूहळू पोपटी केळीच्या पानावर काढायची. मस्त एकत्र बसून, गप्पा टप्पा रंगवत, एकेक शेंगा सोलून खात पोपटीचा बेत रंगतो. छान थंडीमध्ये गरमागरम पोपटी भन्नाट लागते.
We certainly loved this 😍
#पोपटी #अलिबाग #थंडी #popati #popti #winterspecial #edwan #traditionalfood #traditional #food #recipes #trending #marathi #maharashtrian #एडवण #harvest