वातावरणात सकाळच्या वेळी छान थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. बदलणा-या वातावरणाच्या सोबतीला कफ, खोकला देखील सोबत करतोय. तर हिवाळ्यातील खास औषधी असा, केळीच्या पानातील बिनतेला-तुपातला गावठी चिकनचा पुडला (खास खोकल्यावर गुणकारी आणि बाळंतीणीसाठी)
४००-५०० ग्रॅम ची छोटी गावठी कोंबडी सोलून साफ करून घ्या. २५०- ३०० ग्रॅम पर्यंत चिकन मिळेल. स्वच्छ धुतलेल्या चिकनला एक लहान चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळेमिरे पावडर, एक चमचा जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित चोळून घ्या. १५-३० मिनिटे मुरू द्या. तेल- तुप काहीही वापरायचे नाही.
केळीची मोठी पाने घ्यायची. एक पान मोठे अखंड ठेवायचे आणि ६-७ पाने लहान करावीत. पाने धुवून पुसून मग त्यांना गॅसच्या आचेवर फिरवून मऊसर करून घ्यायची. मुरवत ठेवलेले सर्व चिकन एका मध्यम आकाराच्या पानावर ठेऊन पानांनी चारही बाजूने व्यवस्थित पुडला बांधत जा. त्या पुडल्याला दुस-या पानात ठेवून परत पुडला बांधा. असे २-३ पुडले बांधून मोठ्या पानात बांधा आणि केळीच्या पानांच्या वाकीने किंवा सुताने घट्ट बांधा. चुलीवर खोलगट जाडसर कढई ठेवून मग त्यात हा पुडला पुर्ण बसेल असा ठेवा. वरून झाकण ठेवा. वाफेवर १५ मिनिटे शिजू दया आणि मग झाकण काढून पुडला उलटा करा. दुसऱ्या बाजूने देखील १५-२० मिनिटे शिजू द्या. (चुलीवर किंवा गॅसवर करू शकता. पण आच मध्यम ठेवा.)
आचेवरून कढई बाजूला काढून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा. आणि मग पुडला काढून अलगद खोला. छान दरवळ उठतो. केळीच्या पानाचा अर्कात तयार झालेले गावठी चिकन म्हणजेच तयार पुडला चिकन केळीच्या पानात काढून वाढा. खाल्ल्यानंतर थोडा वेळ पाणी पिऊ नये. औषधी म्हणून हे चिकन बनवले जाते म्हणून खाल्ल्यानंतर त्याचे गुणधर्म चांगल्या प्रकारे लाभावेत म्हणून पाणी लगेच पित नाहीत. फार गुणकारी आहे.
Insta Reel Link: