जायफळ आणि जायवंत्री/ जायपत्री/ जाविंत्री/ सालीचे लोणचे
Nutmeg and Mace
जायफळ- केशर युक्त खरवस म्हणा किंवा जायफळ असलेले श्रीखंड, जायफळाच्या विशिष्ट चवीमुळे, त्याचा स्वाद आपल्या जीभेवर दरवळत राहतो. पुरणपोळीचीही चव वधारते. गोडूस सुगंधाचे जायफळ, आपण निरनिराळ्या गोड जिन्नसांमधे पावडर स्वरूपात वापरतो. जायफळाचा विशिष्ट गोड सुगंध हा अनेकांना मोहित करतो. जायफळा ची चव आणि सुगंध दोन्ही उग्र स्वरूपाचे असतात. जायफळ ही झाडाच्या फळाची बी असते. साधारण अंडवर्तुळाकार आकार असतो. वापरण्यासाठी किसणीवर किसून बारीक पुड करता येते.
कधी झोप येत नसेल तेव्हा जायफळाचे चाटण अनेकांनी चाखले असेल आणि अनुभव घेतला असेल प्रभावीपणाचा. तर असे हे जायफळ…
मिश्र मसाले बनवताना देखील जायफळाचा वापर होतो. जायफळाच्या पावडरीचा आयुर्वेदिक औषधांमधे तसेच सौंदर्यप्रसाधनांमधे देखील उपयोग केला जातो. लहान मुलांना चाटवण बनवताना देखील जायफळ लागते.
तर इंडोनेशिया मुळ असलेल्या जायफळाची भारतात अनेक प्रांतात लागवड होते. केरळा- कर्नाटक पट्ट्यात व्यावसायिक स्वरूपात उत्पादन घेतले जाते. आकारानुसार वेगवेगळ्या श्रेणीत विभागले जाते. कोकणात देखील ब-यापैकी झाडे लावली आहेत. चांगली जायफळं मिळतात. पालघरमधील माहिम गावातील, बागेतील दर्जेदार जायफळ व जायवंत्री आणि काळेमिरे आम्ही काही दिवसांपूर्वीच घेऊन आलो. अनेक जणांच्या वाड्यांमध्ये जायफळाची झाडे आहेत. आपल्या पालघर पट्ट्यात साधारण मध्यम आकाराची जायफळं तयार होतात. दक्षिण भारतातून येणारी जायफळं आणि जायवंत्री मोठ्या आकाराची असतात.
जायफळाची हिरवी फळे पक्व झाली असता, पिवळसर रंगाची होऊ लागतात. आणि हळूहळू तडकतात. आतून लाल रंगाची जायवंत्री आच्छादन असलेले जायफळाचे कवच डोकावते. ते फळांपासून वेगळे करून जायफळावरची लाल जायवंत्री आपण दोन तीन दिवस सुकवून मसाल्यांमधे सुगंधित मसाला पदार्थ म्हणून वापरू शकतो. ओलसर वजनी साल सुकल्यानंतर हलकी होते. जायवंत्री महागड्या मसाल्यांमधे गणला जाणारा जिन्नस आहे. बिर्याणी पुलाव, खास प्रकारचे शाही मसाले, मटणाचे पदार्थ ह्यात विशिष्ट जायक्यासाठी जायवंत्री आवर्जून वापरतात.
जायफळाचे वरचे काळसर चकचकीत आवरण फोडून करडे फळ म्हणजेच जायफळ मोकळे करतात. फोडून पावडर करून किंवा किसून आपण वापरू शकतो.
– जायफळाच्या हिरव्या फळांचे चटपटीत लोणचे
जायफळाच्या मुख्य हिरव्या फळाची साल आंबट- तुरट चवीची असते. सालीचे उत्तम लोणचे बनवले जाते. कोकणात अनेक घरी घरगुती वापरापुरते हे लोणचे बनवले जाते.
पक्व जायफळ झाडावरून काढून स्वच्छ धुवून घ्यावीत. तडकली असतील तर फळांचे दोन भाग करून मधले जायफळ आणि जायपत्री सोडवून घ्यावीत. जायफळ आणि जायवंत्री ३-५ दिवस सुकवून घ्यावी.
जायफळाच्या हिरवट पिवळ्या फळांच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. त्यामधे मीठ आणि हळद टाकून चांगले मिसळून दोन ते तीन तास मुरू द्यावे.
तेल गरम करून मोहरी आणि हिंगाची मस्त कडक फोडणी करून घ्यावी आणि थंड होत ठेवावे. कापांवर लोणच्याचा तयार मसाला, आवडीप्रमाणे गुळ, अर्ध्या लिंबाचा रस टाकून मिसळून घ्यावे. वरून तापवून थंड केलेले तडका दिलेले तेल ओतून एकजीव करावे. लगेच खायलाही उत्तम लागते. जायफळाचा उग्रपणा कुठेही जास्त overpower करत नाही. साधारण कैरीची चव जाणवते खाताना. ४-५ दिवसांत उत्तम मुरते. ओलसर फळं असल्याने काचेच्या बरणीत भरलेले हे लोणचे मी फ्रिजमध्ये ठेवते.
मी ह्यावेळी जायफळाची साल आणि ओले काळेमिरे ह्याचे लोणचे बाबांसाठी बनवले होते. जायफळाच्या फोडींबरोबरच, ओले काळेमिरे मुरवत ठेवले होते. अर्थातच हे फ्रिजमध्ये ठेवावे लागते किंवा तेलाचा थर वरपर्यंत असावा लागतो.
#nutmeg#mace#जायफळ#जायवंत्री#जायपत्री













