You are currently viewing ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे

ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे

ओली हळद आणि आंबेहळद लोणचे दोन प्रकारे:

मस्त हलकीशी गुलाबी थंडी पहाटेला विरारला जाणवू लागलेय…. बाजारात सध्या भरपुर चांगले आवळे, ओली हळद, आंबेहळद बाजारात उपलब्ध ‌आहेत. दरवर्षी आवळा-आंबेहळद-हळदीचे लोणचे ह्या सुमारास भरतोच आम्ही. आधी ग्रुपवर लोणचे मसाला वापरून केलेले लोणचे पोस्ट केले होते आता त्यासोबतच राईचे तेल आणि राईडाळ वापरून केलेले लोणचे अशा दोन प्रकारच्या लोणच्याची पध्दत दिली आहे.

ओल्या हळदीचे तुकडे करताना दरवळणारा तो विशिष्ट सुगंध मला फार आवडतो. कसला मोहक रंग तो ओल्या हळदीचा…. तळहातही सुरेख गडद पिवळसर रंग लेवून हळदुला होतो… 💛 आंबेहळद, ओली हळद, आले वैगरे कापताना जो दरवळ उठतो, तो अनुभवणे, itself is a meditation 😃

बाजारात जेव्हा मुबलक प्रमाणात ओली हळद, ताजी आंबेहळद, रसदार लिंबे, चांगले पक्व आले, हिरव्यागार मिरच्या आणि उत्कृष्ट रानआवळे उपलब्ध होतात, तेव्हा आपण बनवू शकतो हे आंबेहळदीचे चविष्ट लोणचे!

पध्दत १: लोणचे मसाला वापरून

साहित्य: (साहित्य प्रमाणे आवडी-निवडीप्रमाणे कमी-अधिक करू शकता)

१. १०० ग्रॅम आंबेहळद

२. ५० ग्रॅम ओली हळद

३. १५० ग्रॅम आले

४. ४-५ मोठे आवळे

५. ४-५ लिंबू (आम्ही जास्त घालतो)

६. १४-१५ हिरव्या मिरच्या

७. मीठ चवीनुसार

८. चिमूटभर साखर

९. अर्धा चमचा हळद

१०. १०० -१२५ ग्रॅम तयार लोणचे मसाला

(तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ भाजून मिक्सरमधे जाडसर भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर,‌‌ अर्धा चमचा थोडीसे भाजून‌ जाडसर भरडलेले मेथीदाणे असे सर्व एकत्र मिक्स करून भरडून वापरता येतात.)

चला सोपी कृती पाहू.

१. सर्व साहित्य स्वच्छ धुवून, कपड्याने पुसून घ्या. पाण्याचा अंश राहता कामा नये.

२. सर्व साहित्य बुडेल इतपत तेल अंदाजाने घ्या आणि गरम करा. नंतर थंड करत ठेवा.

३. एका लिंबू च्या आठ ह्याप्रमाणे लहान फोडी करा. बिया काढून टाका.

४. आंबेहळद, आले, ओली हळद यांची साले काढून मग बारीक कापून घ्या.

५. आवळ्याचे व मिरचीचे देखील बारीक तुकडे करा.

६. सगळे एकत्र करून मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. (साधारण ९-१० तास रहायला हवे)

७. सकाळी सगळ्या मिश्रणात १०० -१२५ ग्रॅम तयार महाराष्ट्रीयन पध्द्तीचा लोणचे मसाला टाकून मिक्स करा.

८. गरम करून थंड केलेले तेल त्यात टाकून व्यवस्थित परता.

बरणी मधे भरून ठेवा. आम्ही हे फ्रिजमधे ठेवतो, कारण काहीवेळा आंबेहळद आणि ओली हळदीमध्ये पाण्याचा अंश राहू शकतो, ज्यामुळे लोणचे फसफसू शकते.

ओली हळद, आंबेहळद, आले किसून सुध्दा छान‌ लोणचे बनवता येते. गावठी लसूण पण चांगला लागतो ह्यात.

पध्दत २: कच्च्या घाणीच्या राईच्या तेलामध्ये

साहित्य:

१. १०० ग्रॅम आंबेहळद

२. ५० ग्रॅम ओली हळद

३. १५० ग्रॅम आले

४. ४-५ मोठे आवळे

५. १- २ लिंबांचा रस

६. २५-३० हिरव्या मिरच्या

७. सैंधव किंवा हिमालयीन पिंक मीठ चवीनुसार

८. कच्च्या घाणीचे राईचे तेल (अंदाजे सर्व साहित्य मावेल इतपत)

९. अर्धा चमचा हळद

१०. १०० ग्रॅम राईडाळ+ १५ ग्रॅम जीरा+ १५ ग्रॅम काळेमिरे+ १५ ग्रॅम बडीशेप+ १० ग्रॅम ओवा+ अगदी थोडेसे चिमुटभर मेथी दाणे

हे सर्व मंद आचेवर भाजून जाडसर भरडले.

कृती:

सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून घेतलेले सर्व बारीक चिरून घेतले. त्यात हिमालयीन पिंक मीठ आणि थोडे रोजचे मीठ आणि हळद चोळून घेतली. आणि वरून सफेद कापड बांधून दोन दिवस ऊन दाखवले. छान ऊन दाखवले की कापा थोड्या सुरकुततात पण खराब व्हायचे भिती कमी होते. आणि तसेही लोणचे बनवल्यानंतर तेलात आठवडाभर मुरल्यावर परत कापा फुलतात.

कच्च्या घाणीचे राईचे तेल चांगले‌ गरम केले. त्यात हिंग- मोहरीची फोडणी केली. मग गॅस बंद करून, वर नमूद केलेली भरड त्या तेलात घातली. छान मिसळून घेतले. हे सारे सुकवलेल्या कापांवर ओतून वरखाली करत मिसळले. एका लिंबाचा रस देखील वापरला.

थंड झाल्यावर बरणीत काढून, चार- पाच दिवस बाहेरच छान मुरू दिले. कापा सुकलेल्या असल्याने फसफसले नाही. चांगले लागले चवीला. राईच्या तेलाने चव वधारते.

#pickles#achar#lonache#lonache_masala#marathi_food#Contest_alert#लोणचे_स्पेशल#pickles

Leave a Reply