पावसाळा सुरू झाला कि एडवणला घरी जाताना, महामार्गावरून वरई फाट्यावर सफाळेसाठी वळतो, तेव्हा दुतर्फा अगदी गर्द हिरव्यागार झाडा- झुडपांनी वेढलेल्या रस्त्यावरून जायचा आनंद निराळाच असतो. तांदूळवाडी चा डोंगर, सफाळ्याचा घाट निसर्गसौंदर्य उधळत असतात. या रस्त्यांलगत आदिवासी, आगरी अशा खास वस्त्या आहेत. रस्त्याच्या बाजूला, उन्हाळ्यात जांभळं, गावठी खजूर, ताडगोळे, पेरू, करवंद, जाम, आंबे, केळी, चिकू, गजरे, फणस असे नानाविविध रानमेवे छान पानांचे द्रोण करून विकतात स्थानिक लोक… आणि पावसाळ्यात शेवळं, रानभाज्या, नवधारी भेंडी, अळूची पाने, कुळी भाजीच्या जुड्या, शेवग्याच्या शेंगांच्या जुड्या, निरनिराळे कंद आणि आपले नशीब चांगले असेल तर गावठी मशरूम विक्रिसाठी आढळतात. जाडसर पानांमध्ये, माती लागलेल्या स्वरूपातच हे अळिंबीचे कळे ठेवलेले असतात.
फोटोमधे फुललेले आणि कळा अळिंबी आहेत ते पुर्वी आमच्या सफाळे, पालघर, डहाणू कडच्या गावरान बायका विशेषत: आदिवासी बायका पावसाळ्यात वाट्यावर विकायला यायच्या. आताही आणतात पण कमी प्रमाणात. १२-१५ अळिंबी चा एक वाटा सहज ८०/- ते १००/- रूपयांमधे असतो. ब-यापैकी महाग असते पण तेवढेच पौष्टिक देखील आहे.
फुललेल्या पेक्षा कळी स्वरूपात असलेले अळिंबी जास्त चांगले. मुक्या अळिंबी. अनेकांच्या शेतामधे बांधावर, वानवडीत रस्त्यांच्या लगतच्या झाडीमधल्या चढीवर किंवा एखाद्या झाडाच्या थोड्याशा ओलसर खोडाच्या बुंध्याशी उगवतात ही. पण विषारी आणि बिनविषारी अशी ओळखता आली पाहिजे.
पाण्याने साफ करून बारीक चिरायचे. आणि साजूक तुपावर फक्त आले-लसूण पेस्ट, काळे मिरे, हळद आणि मीठ वापरून मटणासारख्या चवीची पौष्टिक भाजी बनवली जाते. आदिवासींना नैसर्गिक वनस्पती आणि औषधी गुणधर्माची योग्य माहिती असतेच. पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणा-या ह्या अळिंबीची एकदातरी अशी भाजी करून खाल्ली जाते.
गावाकडे ‘कुत्र्याची छत्री’ म्हणून हिणवले जाणारे हे अळिंबी म्हणजे अगॅंरीकस प्रवर्गातील खाण्यासाठी योग्य असा बुरशीचा प्रकार आहे. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळं येतात, त्या फळांस अळिंबी किंवा भूछत्र असे म्हणतात. अळंबीचे म्हणजेच मशरूम चे निसर्गात अनेक प्रकार आढळून येतात. आपल्याकडे विशेषतः बटण मशरूम शहरी बाजारातही सहज मिळते. आजकल माॅलस् मधे ‘wild mushrooms’ म्हणून अनेक exotic प्रकारही उपलब्ध असतात. गावच्या अळिंबींची चव फार निराळी असते बटण मशरूमपेक्षा… मला स्वतःला देखील फार आवडते भाजी.
#अळिंबी#अळंबी#मशरूम#mushrooms#mushroom#edwan#saphale#villagelife



