You are currently viewing खसखस/ पोस्ता दाना/ Poppy Seeds

खसखस/ पोस्ता दाना/ Poppy Seeds

खसखस/ पोस्ता दाना/ Poppy Seeds

Opium seeds आणि अफिमचे उत्पादन

ज्या पीकापासून अंमली पदार्थ अफिम चे उत्पादन होते, त्यापासूनच आपल्याला मसाल्याचा पदार्थ खसखस/ पोस्ता दाणे मिळतात. अनेक देशांमधे प्रतिबंधित असलेले खसखस, भारतामधे कायदेशीरपणे उत्पादित होते, विकले जाते आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांमधे सर्वत्र वापरलेही जाते.

खसखशीवर थापलेले अनारसे असो, खसखशीचा हलवा, खसखस लावून सजवलेल्या उंची मिठाई, वा डिंकाचे लाडू आणि खसखस असलेला कोल्हापुरी पांढरा रस्सा, खसखशीची चव आणि पोत त्या पदार्थांना वेगळ्याच उंचीवर नेतात. खसखस दाणे भारतातील बहुतांश जागी, मसाला किंवा किराणा दुकानात, माॅलमधे सहज उपलब्ध होतात. साधारणपणे इतर साबूत मसाल्यांपेक्षा थोडेसे महागडे असते खसखस.‌ वापर देखील तसा मोजकाच होतो.

खसखस चे shelf life ब-यापैकी असले तरी आजकालच्या वातावरणात खसखस लवकर खराब होते. गोडूस असल्याने पटकन लहान पाखरू, किड धरतात. जास्त दिवस राहिल्यास रंग बदलू लागतो. वास पण खवट असा जाणवू लागतो आणि चवीमधला फरक लगेच कळून येतो. म्हणून खसखस खात्रीच्या दुकानातून आणि हवी तेवढ्याच प्रमाणात घ्यावी. शक्यतो फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे रंग, चव व्यवस्थित राहते.

खसखस सफेद- पिवळसर हलक्या सोनेरी आणि जांभळट रंगाची असते. बारीकशा बिया अगदी नीट पाहिल्या तर किडणीच्या आकाराच्या वाटतात. भारतात आपण साधारणपणे पिवळसर खसखस वापरतो. पदार्थांना‌ दाटसरपणा आणण्याचे काम खसखस करते. थंड प्रकृतीची खसखस ही शरीराला थंडावा देते. होळीसाठी बनवल्या जाणा-या थंडाईमधेही काही वेळा खसखस चा वापर होतो. दर्जानुसार खसखस प्रती क्विंटल दीड ते दोन लाख भावाने विकली जाते. घाऊक बाजारात साधारण १४००/- ते २८००/- प्रति किलो ने सध्याचा भाव आहे.

जगभरात अनेक देशांमध्ये खसखस ची लागवड होते. अफगाणिस्तान मधे मोठ्या प्रमाणावर होते. भारतात राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतील काही भागांमध्ये खसखशीच्या पीकाची लागवड होते. इतरही काही राज्यांमधे थोड्या प्रमाणात होत असते. ज्या पीकापासून खसखस उत्पादित होते त्याचपासून अफिम ह्या अंमली पदार्थांचे उत्पादन होते म्हणून हे पीक घेण्यासाठी लागणा-या सर्व परवानग्या ह्या नार्कोटिक्स आणि वित्त-अर्थ मंत्रालयाकडून घ्याव्या लागतात. पिढ्यानपिढ्या जे शेतकरी ही शेती करतात त्यांना अर्धातच प्राधान्य दिले जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या आसपास निवेदन अर्ज भरून केंद्रीय नार्कोटिक्स कडे दिले जातात. शेतीची जागा आणि अन्य तपशील यांची माहिती व्यवस्थित द्यावी लागते. अर्ज मान्य झाल्यास दोन माणसांच्या साक्षीने खसखस पीकाची लागवड करण्याची मान्यता आणि Licence दिले जाते. ह्यातून होणा-या अफिमचे उत्पादनावर सरकार आणि नार्कोटिक्स च्या नेमलेल्या अधिका-याचे लक्ष असते. तयार‌ झालेला अफिमचा चीक सरकार पुर्णपणे ठरलेल्या भावाने विकत घेऊन शेतक-याला मोबदला देते. पुर्वी खसखस आणि ज्या सुकलेल्या बोंडांतुन खसखस काढतात ती बोंडे देखील सरकार घेत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून खसखस आणि सुकलेली बोंडे शेतकरी मार्केट यार्ड मधे विकतो. अर्थातच तस्करी वेगरेचे त्रासदायक प्रकार चालतात त्यावर यंत्रणेची करडी नजर असते.

आपल्याला‌ ह्या लेखासाठी माहितीपुर्ण फोटो उदयपुर च्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अंकित (Ankit Dadheech, Udaipur) ह्यांनी दिले आहेत. ते अनेक कृषीविषयक गोष्टींमधे मार्गदर्शन करतात. खसखस चे वेगवेगळ्या टप्प्यातील फोटो त्यांनी आपल्याला दिले आहेत.

खसखस उत्पादनासाठी जमीनीचा साधारण भुसभुशीत पोत, साधारण थंड वातावरण लागते. जवाहर अफीम 539, जवाहर अफीम 540 अशी काही ठराविक बियाणी वापरली जातात. शेतकरी पिढ्यांपासून चालत आलेली वाणे वापरण्यावर भर देतात. पक्ष्यांचा- विशेषतः पोपटाचा उपद्रव जास्त असल्याने, लागवड क्षेत्रावर थोड्या उंचावर नेट/ जाळी बांधतात. तसेच पीकाला संरक्षण म्हणून चारही बाजूने उंच वाढणारी आणि घनदाट पीके जसे मका वैगरे लावतात. म्हणजे अतिरिक्त हवा, चोर ह्यापासून थोडे संरक्षण मिळते. शेतकरी पीकाचा हंगाम सुरू झाल्यावर शेतातच बिह्राड मांडतात. तस्करी- चोरीची भिती कमी होते. लागवड साधारण ऑक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मधे करण्यात येते. (पिके कोवळी असताना साधारण १ महिन्यांची, कोवळ्या पानांची भाजीदेखील केली जाते.) फेब्रुवारी-मार्च मधे साधारण ३-४ महिन्यांनी फुले यायला सुरुवात होते. फुले सफेद रंगाची आणि देखणी असतात. आणि फुले गळून जेव्हा फळ धरायला, ज्याला ते ‘डोडा’ संबोधतात ते बनायला सुरवात होते. ते हिरव्या रंगाचे असते. पक्व होताना ते मजबूत होत जाताना विशिष्ट १५ दिवसांचा कालावधी असतो त्यात डोड्याला धारधार उपकरण जे पंजा सारखे असते, ‘नक्का’ त्याच्या सहाय्याने खालून वरच्या दिशेने चिरा पाडल्या जातात. साधारण मध्यान्ह च्या वेळी मनुष्यबळ लावून हे काम केले जाते. चिरांमधून पांढरा चीक निघतो हा म्हणजे अफिम. हा असाच डोड्यावर रात्रभर सोडून घट्ट होऊ देतात. रंग ब्राऊन होत जातो आणि सकाळी धातुच्या पट्टीच्या सहाय्याने तो एका भाड्यात जमा केला जातो. हा जमा केलेल्या चीकाच्या वजनाची नोंद नेमुन दिलेला माणूस करतो. जोपर्यंत चिर पाडल्यावर चीक निघतो तोवर चिरा पाडायची प्रक्रिया चालू राहते. जमा चीक काही दिवस पंख्याखाली वाळवून घट्ट झाला कि नार्कोटिक्स डिपार्टमेंट ते विकत घेते. त्यातील Morphine च्या प्रमाणानुसार त्याची प्रतवारी होते आणि किंमत ठरते. कुठेही गैरव्यवहार दिसला तर सरकार परमिट/ लायसन्स रद्द करते.

काही दिवसांनी डोडे पक्व झाले कि वरचे आवरण चिरून खसखशीचे दाणे काढतात. खसखस जरा सुकली कि मार्केटसाठी तयार होते. सोबतच रिकामी डोडे देखील चांगला भाव मिळवून देतात. थोडाफार अफिम अंश त्यात राहत असणार मग काही औषधे बनवताना ह्याचा वापर होतो. अजूनही काही वापर अर्थातच असावेत. खसखस म्हणजे पोस्ता दाना मध्यप्रदेश ची निमच मंडी (Neemuch Mandi), राजस्थानची झालरापाटन मंडी अशा काही मंडींमधे खसखस चे लिलाव (Auction) लागतात. इथुन पुर्ण देशभरात खसखस पोहोचते.

बंगालची आलु पोस्तो आणि काही मच्छी चे पदार्थ मी १० वर्षापुर्वी बंगाल- कोलकाता मधे खाल्ले होते. ती चव मी विसरूच शकत नाही. तसेच आपल्या महाराष्ट्रात आपण जो खसखशीवर फुलवत अनारसा बनवतो त्याची बातच निराळी. खसखस दाणे भिजवून- उमलल्यावर, तुपावर भाजून सुकामेवा पेरून बनवलेला खसखशीचा हलवा मी माझ्या ऑफिसमधील एका मित्राच्या डब्यात पाहिला होता. पोस्तो दाना हलवा! तो खाल्ल्यावर हलकी पेंग येते असे ते म्हणालेला. Earthen- delicate तरीही rich note काहीशी होती. नंतर काही वर्षांत इंटरनेटवरून नजरेखालून कधीतरी खसखशीची खीर, खसखसच्या वड्या गेल्या.

माझी मम्मी कधीतरी थंडीमधे तुपात खसखस फुलवून त्यावर खजूर परतून देत असे. फारच छान लागायचा. अनेक मिठाईदेखील खसखस दाणे लावून येतात तेव्हा छान दिसतात. बाळंतपणानंतर खसखशीची खीर, लाडू आवर्जून दिले जातात. खसखशीमुळे झोप चांगली लागते. आणि वेदना कमी करणे वैगरे असे गुणधर्म वाचून आहे. कोल्हापुरला आमच्या घरी जो पांढरा रस्सा आई बनवते त्यात चांगल्या प्रमाणात खसखस वापरली जाते, काय वर्णावी त्या पांढ-या रश्याची चव. तसेच इतर वेळीही चिकन किंवा मटणाच्या पदार्थांत आम्ही खसखस वापरतो.

आम्ही अनेक मसाल्यांमधे आणि रोजच्या वापराचे मसाले बनवताना थोड्या प्रमाणात पण आवर्जून खसखस वापरतो. पदार्थाला दाटसरपणा आणि एक विशिष्ट चव खसखस मुळे प्राप्त होते. हलकेच भाजल्यावर अजून खमंगपणा व स्वाद खुलतो.

काळी खसखस आपल्याकडे आता आता मिळायला लागली आहे. मी एकदाच वापरली होती पण चव साधारण आपल्या पिवळसर खसखस सारखीच वाटली. बेकिंग आणि काही खास ब्रेड काही देशांमध्ये बनवले जातात. खसखस फुले अतिशय सुरेख दिसतात आणि पांढरा तसेच इतर मोहक रंगांमध्ये देखील असतात. काश्मीर मधे फिरताना‌ खसखशीच्या फुलासारखी पण लाल रंगाची फुले बरीच पाहिली. पण ती नक्की कोणती ते मात्र कळाले नाही. पण सुरेख होती. मध्यप्रदेश आणि उदयपुर ला गेले असता, बरेच प्रयत्न करूनही ह्या पीकांना‌‌ सिझन आणि ओळखी नसल्याने भेट देता आली नाही. असो! लवकरच कधीतरी 🙂🧿

तर असा हा मसाल्यांमधील भन्नाट पदार्थ खसखस!

Note: ह्यातले काही फोटो मी काढलेले आहेत. तर शेतातील फोटो हे Udaipur येथील Ankit Dadheech ह्यांनी पाठवले आहेत. ४-५ फोटो इंटरनेटवरून as it is माहितीसाठी घेतले आहेत.

#खसखस#पोस्तोदाणा#पोस्तो#poppyseed#poppy#poppyseeds#Indianspices#spicesfromIndia#spiceblends#Anarasa#अफिम#अफू#भारतीयमसाले

Leave a Reply