You are currently viewing सोललेल्या मुगाचे बिरडे

सोललेल्या मुगाचे बिरडे

सोललेल्या मुगाचे बिरडे, मुरलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि वाफाळता भात! बस्स! इतकेच तीन ताटातील पदार्थ, अगदी मनाला तृप्त करू शकतात.

मुगाचे कढण, मुग-बटाटा सुकी भाजी, मुगाची चिंच लावून केलेली उसळ, मुगडाळ पेज, मुगडाळ वर्ण, मुग भजी, मिरची वरचे तिखट मुग, उपवासाचे गोड मुग, सलादमधले मोड आलेले कच्चे मुग हे सगळेच आवडते. पण मुगाचे बिरडे म्हणजे ultimate ❤️ आणि नुसती सालच ती‌ काय काढतो आपण तरीही सोललेले मुग आणि नेहमीचे मुग ह्यांच्या चवीत जमीन-आसमान चा फरक…

दोन दिवस आधी मुग भिजवायचे. पहिल्या दिवशी भिजवून, मग रात्री टोपलीत ठेऊन मोड आणायचे. मग परत दुस-या दिवशी पाण्यात भिजवायचे. आणि मग साले जरा सुटू लागली की ती तरंगणारी साले, पाण्याने धुवत धुवत वरच्यावर टिपत काढून बाजूला ढीग रचायचा. उरलेल्या मुगांना हाताने अलगद चोळायचे, परत साले, परत टिपणे, ढिगारा रचणे! This is so addictive and soothing sometimes. वेळ खुप जातो पण साले काढत काढत शेवटी एकही हिरवे साल राहत नाही आणि टप्पोरे पिवळसर दाणे बाकी राहतात, तेव्हा फार मज्जा येते. तसे मिळायला बाजारात अगदी सहज मिळतात भिजवलेली, मोड आलेली कडधान्ये विकणा-यांकडे. फक्त एक दिवस आधी सांगावे लागते. संकष्टीला कधीतरी आमच्या भाजीवाल्या अमोल काकांकडून घेतेही अनेकदा. पण वेळ असला की घरीच हे करायला मनापासून आवडते.

हे बिरडे पुणेकर, सीकेपी की कोकणी पध्द्तीने ह्यांत न‌ अडकता मी आम्हाला आवडते तशी दोन-तीन पध्दतीने बनवते. अर्थात मुख्य authentic पाककृती जरा वेगळी आहे. पण ही पण छान लागते चवीला. जाड बुडाच्या कढईत फोडणीला इवलासा तज (दालचिनीचा) तुकडा, दोन तमालपत्र, एखादी काळी मसाला वेलची, जरासे जीरे हे तापलेल्या तेलावर छान परतत तडतडवते. (कधी कधी नुस्त्या मोहरी, हिंग आणि जीरे फोडणीवर सुद्धा करते सोललेल्या मुगाचे बिरडे)

मग बारीक चिरलेला कांदा, जरा मीठ घालून, कांदा अर्धपारदर्शक होईपर्यंत परतत, वाफेवर शिजवते. आवडत असल्याने ब-यापैकी जास्त कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते.

त्यानंतर खवलेला नारळ, कमी तिखट अशी एखादी हिरवी मिरची, जीरे, जरासे आले आणि कोथिंबीर मिक्सरमधून जराशी दरदरीत वाटून घेतलेली भरड घालून छान परतते.

आमचा रोजचा घरगुती मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद, पावच चमचा धणा पावडर, चवीनुसार मीठ टाकून परतते. जरा दोन‌च मिनिटे झाकण ठेवते. नंतर झाकण काढून त्यात सोललेले मुग अलगद पसरते आणि हलक्या हाताने मिसळून घेते. (नुस्ते जीरा पावडर, धणा पावडर, हळद आणि मिरची पावडर वापरून पण करता येते.)

ताजे काढलेले नारळाचे दुध त्यामधे घालून मग परत १० मिनिटे झाकण ठेवून वाफ काढते. एकदा परतून त्यात गुळाचा खडा आणि ३-४ रसरशीत कोकमं धुवून पाण्यात भिजवून ठेवलेली असतात ती पाण्यासकट घालून ढवळते. जराशी काश्मिरी मिरची पावडर मिसळते म्हणजे रंग आणि तर्री येते. पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ. मग परत एकदा कोथिंबीर पेरते आणि झाले बिरडे तय्यार! व्यवस्थित शिजूनदेखील, मुग अखंड राहणे हे उत्तम स्किल! लगेचच गरमागरम चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत, मुगाचे बिर्डे/ बिरडे घेऊन फक्त आनंद घ्यायचा. गुळ, कोकम आणि कोथिंबीर चा असा काही छान फ्लेवर उतरतो की बस…

भारीच प्रकार आहे हा! ❤️

#मुगाचेबिरडे

Leave a Reply