मस्त पावसाला सुरुवात झाली आजपासून. क्षणात गारेगार आल्हाददायक वातावरण. कोळीण मावशीकडे कोलंबी छान मिळाली मग हा साधासुधा झटपट होणारा कोलंबीभात जो अगदी कोणीही सहज बनवू शकतो तो बनवायचा बेत ठरला. हा बिर्याणी-पुलाव सारखा पण करता येतो किंवा साधा खिचडीसारखा. कसाही करा छानच होतो चवीला. हा नारळाचे दुध वापरून केलेला भात पण रोजच्या कोलंबी- भातासारखाच करतो, फक्त पाण्याच्या जागी नारळाचे दुध वापरतो. कोलंबीतले सगळे अर्क भातामधे सुरेख मिसळतात. आमचाच लक्ष्मी मसालेचा पुलाव बिर्याणी मसाला मी ह्यात वापरते.
साहित्य:
१. दोन वाट्या बासमती तांदूळ किंवा तुमच्या आवडीचा तांदूळ. (अर्धा तास भिजवून निथळलेला) आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ छान लागतो पण घरी दोन्ही उपलब्ध नसल्यामुळे बासमती वापरला.
२. 15-20 मध्यम आकाराच्या कोलंबी, साफ करून पुर्ण साल काढून किंवा सालासकट
३. दोन लहान चमचे आले लसूण वाटण
४. एक लिंबूचा रस
५. मधे उभी चिर पाडून ४ हिरव्या मिरच्या
६. एक वाटी ताजी कोथिंबीर बारीक चिरून
७. दोन कांदे उभे चिरून
८. अर्ध्या नारळाचे दूध (मोठ्या नारळाचा अर्धा भाग, खवून त्याचे दुध काढा.)
मसाल्याचे पदार्थ:
१. दोन मसाला वेलची
२. सहा हिरवी वेलची
३. दोन दालचिनी तुकडे
४. चार तमालपत्र
५. आठ दहा काळेमिरे
६. चार लवंगा
७. थोडेसे शहाजीरे
८. एक जायवंत्री
९. थोडी कसूरी मेथी
१०. मीठ
११. तेल व तुप
१२. सेलम हळद पावडर
१३. पुलाव-बिर्याणी मसाला
१४. धणा जीरा पावडर
१. एका भांड्यात मोजके तेल गरम करून सगळे अख्खे खडे मसाले तेलात फोडणीला टाकून नीट परतायचे.
२. चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंगावर तळून घ्यायचा. आलेलसूण पेस्ट टाकून परतून घ्यायचे.
३. हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, कसूरी मेथी, मीठ, गरम मसाला दोन ते तीन चमचे हे सारे टाकून व्यवस्थित परतायचे. पाच मिनिटं शिजू देऊन लिंबू पिळायचे. पुलाव-बिर्याणी मसाला, सेलम हळद पावडर आणि थोडी धणा-जीरा पावडर टाकून मिसळून घ्यायचे.
४. मग सर्व सोललेल्या कोलंबी टाकून परतायच्या आणि त्यानंतर अर्धा तास भिजवलेला बासमती तांदूळ टाकून व्यवस्थित परतून थोडेसे तूप घालून नीट ढवळायचे. पाच ते दहा मिनिटे परतणे आवश्यक आहे. त्यामुळे भात मोकळा होतो.
५. मिश्रण व्यवस्थित बुडेल एवढे नारळाचे जाड दुध त्यात ओतून अगदी छान मिक्स करून कुकरला दोन शिट्या करून घ्यायच्या. हळदीच्या पानाचा वास आवडत असल्याने आणि नारळाचे दुध वापरत असल्याने मी त्यात हळदीच्या पानाची गाठ बांधून टाकली होती. मस्त हलका सुगंध जाणवत होता.
६. वाफ गेली कि झाकण खोलुन, हलकेच भात वरखाली करा. तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर याचा भातावर थर दयायचे, आवडत असल्यास तळलेले काजू, कोथिंबीर आणि बिरीस्ता वरून टाकायचे.
झाकण काढले की छान सुगंध येतो. तर मग तयार गरमागरम कोलंबी भात सफेद कांदा -दह्याच्या रायत्या बरोबर सर्व्ह करायचा.
– Food Memories Marinated with Love by, स्नेहा चौधरी- इंदूलकर
अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला ‘Like’ करा.
आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.
.
.
.
.
.
.
#कोलंबीभात#prawnsbiryani#prawns#kolambi#prawnspulav#food#foodpreparation#maharastrian#marathi