एडवणला गावी गेलो असता ठायीठायी लागणा-या मस्त हिरव्यागार भाज्यांच्या आणि रंगबेरंगी फळा-फुलांनी बहरलेल्या समृध्द वाड्या बघून मन अगदी ताजेतवाने होऊन जाते. जेव्हा हलकीशी गुलाबी थंडी पसरायला लागते. बागायती जोमात बहरतात… पिटूकली चकाकी ल्यालेली काळी वांगी, चवदार काटेरी वांगी, वेल वांगी, पातीचा कांदा, छोटेसे पण खुप चविष्ट फ्लाॅवर, लुसलुशीत कोबी, त-हेत-हेच्या पालेभाज्या, दुधी भोपळे भारीच वाटते सारे… आणि त्यातच बारीक बारीक उगवलेल्या इवल्याइवल्या कोवळ्या मेथीच्या, केळीच्या सुकलेल्या सालीने बांधलेल्या टोपलीत रचलेल्या जुड्या म्हणजे बहुतेकांचा जीव की प्राण… आम्हाला विरारला देखील उत्तम कोवळ्या ताज्या समुद्रमेथी सहज उपलब्ध होतात.
(वाळूतल्या समुद्रमेथीबाबत थोडेसे:
आता हिवाळ्यात ही समुद्रमेथी आमच्या पालघर पट्ट्यात लावतात. अनेक वाड्या ह्या समुद्रालगत वसलेल्या गावांमधे त्यामुळे जमिनीचा पोतही तसाच. अर्थात इतरही अनेक भागांमधे आजकाल समुद्रमेथीची लागवड होते. पाण्याचा वापर करूनही उगवतात. पण पालघर, डहाणू, वसई वैगरेच्या समुद्रालगतच्या वाड्यांमधे हिवाळ्यात हमखास लावतात त्याची चव फार भारी असते. मुंबईला बाजारात, ह्या मेथीच्या जुड्या टोपल्यांमधे सुबकरित्या रचून, गावावरच्या भाजीवाल्या घेऊन जातात. वाळू किंवा रेतकट माती असलेल्या भुसभुशीत जमिनीत ही इवली-इवली मेथी (मेथा) उगवतात. अगदी आठवडा- दीड आठवड्याभरात लहान लहान कोवळी मेथी तयार होते. अगदी कोवळी असतानाच मुळासकट उपटून ह्यांच्या केळीच्या खोडाच्या सुकलेल्या सालांच्या वाकांनी पिटुकल्या जुड्या बांधतात. हवाहवासा कडवटपणा असतो. निवडताना पाण्यात अगदी ५-६ वेळा धुवून, रेती- वाळू निघेपर्यंत धुणे अत्यावश्यक असते. औषधी आणि पौष्टिक म्हणून ह्या वाळूतल्या समुद्रमेथीचे महत्व आहे. Microgreens आपण सलाद मधे खातो तसेच काहीसे. )
ह्या जुड्या इतक्या सुरेख रचतात टोपलीत कि पाहत राहावे
आजकल पावसाळा- उन्हाळ्यातही कमी-अधिक प्रमाणात मेथीची भाजी उपलब्ध होते. अशा मेथीच्या ताज्या चार पाच जुड्या मस्त घेतल्या. स्वच्छ पाच सहा वेळा पाण्यातून काळजीपूर्वक धुतल्या. कारण मागच्या वेळी नीट काळजी न घेतल्याने, माती ची कचकच भाजी खाताना जाणवली. (बेबी मेथी अगदी उगवताच लगेचच काढतात मग मुळाशी माती कोवळ्या पानांना पण चिकटलेली राहते. म्हणून विशेष काळजी)
आमच्याकडे नेहमीच मेथीचे निरनिराळे पदार्थ बनत. कधी मेथी चपाती म्हणजेच थेपले, मेथीच्या वड्या, मेथी दही भाजी, मेथी कांदा बटाटा भाजी. बटाटे- मेथी- सुके बोंबील भाजी तर खातच राहतील इतकी चविष्ट लागते.
ह्यावेळी मेथी चपाती गुजराती मेथी थेपले पध्दतीने करण्यासाठी मी ही रेसिपी मी मुळच्या गुजरातच्या असलेल्या संगिता ठाकर कडून घेतली आहे!
साहित्य बघुया काय लागते:
रोजची मेथी किंवा समुद्रमेथी बारीक चिरून, तीन चार हिरव्या मिरच्या, हिरवी लसूण पाती, आलेलसूण पेस्ट , कोथिंबीर, दही, लिंबू रस, चिमुटभर ओवा, मीठ, चिमुटभर साखर, सेलम हळद पावडर, बेसन, गहू पीठ, बाजरी पीठ, तेल
सोपे मऊसर थेपले बनवायची पध्दत बघू….
तर मग मी धुतलेल्या मेथीला बारीक चिरले. मग दोन तीन हिरव्या मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरून मेथीत टाकल्या. एक छोटा चमचा आले लसून पेस्ट त्यात घातली. मग त्यातच दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी बाजरीचे पीठ, चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर, सेलम हळद पावडर, एक लिंबूचा रस, तीन- चार चमचे दही आणि हो दहा- बारा ओल्या पातीचे लसूण चेचून व चिमूटभर ओवा टाकला. थोडेसे तेल घालून मिश्रण एकत्र करून घेतले. मिश्रणाला जरा मळून घेतले की जरा पाणी सुटते मग दही घालून मग ह्या मिश्रणामधे हळूहळू पाणी टाकत आपल्याला चपातीच्या पीठासारखे मळून गोळा करायचा असतो. मग चांगला मऊसर गोळा झाला कि तेलाचा हात लावून व वरून ओलसर कापडाने तासभर झाकून पीठ उमलण्यासाठी ठेऊन दिले.
तासभराने, पीठाचे छोटे गोळे करून सुक्या पीठावर चपातीप्रमाणे लाटले. गरम तव्यावर शेकताना मधेमधे तुप सोडत खमंग भाजून घेतले. छान सुगंध येत होता पिवळसर मेथी-चपाती अथवा थेपल्याचा…
ह्या मेथी-चपाती अथवा थेपल्याला थंड दही, कैरीचा छुंदा किंवा हिरव्या मिरचीचे राईतले पिवळसर लोणच्यासोबत खातात. पण मी रोजचे मिक्स लोणचे व गरमागरम आले-वेलची-चहापाती चहासोबत सर्व्ह केले.
मस्त पौष्टिक आणि चवदार मऊसुत मेथी थेपला खा.
#laxmi_masale_edwan#the_masala_bazaar#selam_turmeric_powder#spice_blends