कंटोलीची रानभाजी पावसाळ्यात बहुतेक सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळते. सफाळा- पालघर-विरार मधे आमच्या भाजीवाल्या, आदिवासी महिलावर्ग पानांमध्ये वाटे लावून ही भाजी विकतात. अनेकांकडे श्रावणात हमखास खाल्ली जाते कंटोली. कंटोलीची चव विशेष नसली तरी पौष्टिक म्हणून ती उत्तम रानभाजी मानली जाते. हिरवी मिरची- खोबरे वर परतून वाफेवर बनवली जाते. कधी कांद्यावर परतलेली मसालेदार कंटोली तर कधी बियांसकटच गोल चकत्या करून, मसाले लावून तळून देखील बनवतात.
मधला गर-बिया साफ करून आतमध्ये मसाला भरून परतून देखील कंटोली छान लागतात. कंटोली आवडणारा आणि अक्षरशः कंटोली भाजीच्या प्रेमात असणारा, पावसाळ्यात- श्रावणात कंटोली बाजारात यायची वाट पाहणारा एक चाहता वर्ग देखील आहे बरे का!
आमच्याकडे श्रावणी सोमवारी शंकरांना भाताचा मुदा- दही- साखरेच्या नैवेद्यासोबत दुसरा नैवेद्य दाखवतो त्यात कंटोलीचा समावेश असतो. आज आम्ही लक्ष्मी मसालेचा स्पेशल घरगुती मसाला वापरून कंटोली बनवली.
– टप्पोरी हिरवीगर कंटोली स्वच्छ धुवून, वरचे काटेरी आवरण तासून साफ केले. मधोमध कापून बिया-आतला गर साफ केला. कंटोली धुवून मग बारीक चिरून कुकरला जरा एक वाफ काढून घेतली.
– तेल गरम करून हिंग- राई- जीरा- हिरवी मिरची फोडणी केली. वाफ काढून घेतलेली कंटोली परतली. लक्ष्मी मसालेचा स्पेशल घरगुती मसाला टाकून मग सढळ हस्ते ताजे खोवलेले खोबरे, कोथिंबीर आणि लिंबू रस घातला. मीठ चवीनुसार मिसळून एक वाफ काढली.
– कंटोलीची भाजी तयार! भाकरीसोबत चांगली लागते. पावसाळ्यात एकदा तरी खावी ही भाजी.
#कंटोली#रानभाजी#Ranbhaji#Kantoli#laxmimasale#themasalabazaar#food#vegetables#Maharashtra#Marathi