You are currently viewing शिराळा/ दोडका/ तुराई

शिराळा/ दोडका/ तुराई

शिराळा/ दोडका/ तुराई

इकडच्या वाड्यांमधे शिराळा, दुधी-भोपळा, पडवळ, गलका ह्या प्रकारांची वेल-लागवड केली जाते. त्यापासून उत्पादने घेतली जातात. शेतजमीन आणि वातावरण ह्या भाज्यांना अनुकूल असल्याने उत्पादनही भरघोस आणि दर्जेदार मिळते. भाज्यांनी लगडलेले वेलींचे ताटवे/मांडव अगदी छान वाटतात. अर्थातच जिथे ज्या गोष्टी उगवतात त्याचा स्वयंपाकात वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातलीच एक भाजी म्हणजे शिराळी Ridge gourd. वाड्यांमुळे रसरशीत ताजी शिराळी आमच्या इथे नेहमीच मिळतात. अनेकांना शिराळा हा प्रकार कधीच आवडत नाही पण माझी मात्र ही अगदी आवडीची भाजी आहे.

आमच्याकडे नुसता मिरचीवर परतलेला शिराळा, चणाडाळ-शिराळा, मुग शिराळा, कडवे वाल शिराळा, तुरडाळ-शिराळा, बटाटा-शिराळा-टाॅमेटो, कोलंबी शिराळा अशी रस्स्याची किंवा सुकी भाजी प्रकार बनवले जातात जे छान लागतात. का कुणास ठाऊक पण शिराळा चणाडाळ आणि शिराळा बटाटा भाजी मला नेहमीच सात्त्विक वाटत आली आहे.

हातपोळ्यासारखी भाकरी आणि शिराळ्याची भाजी, लोणच्याचा खार किंवा गरमागरम भात, शिराळ्याचा पातळसर रस्सा आणि त्यात चुरलेला शिराळा आणि बटाट्याची फोड म्हणजे अफलातून घास असतो… शिराळा अगदी जास्त शिजलेला पण चांगला लागत नाही. योग्य शिजलेल्या फोडी मस्त वाटतात.

एखादा शिराळा कडवट तर नाहीए ना हे पडताळण्यासाठी काकडीप्रमाणेच शिराळ्याची चकती कापून चाखून पाहिली जाते. ठसठशीत शिरांच्या शिराळ्याची भाजी करताना त्यावरच्या शिरा आम्ही तासून काढून टाकतो. ह्या शिरांची कुरकुरीत चटणी करता येते.

आता रोजच्या साध्या शिराळा भाज्या प्रकार सहजच देत आहे.

ही घरोघरी होणारी भाजी त्यामुळे सगळ्यांना कृती माहिती असतेच. फक्त आवडीनिवडीप्रमाणे थोड्याफार पध्द्ती वेगळ्या असतात.

• शिराळ्याची चणाडाळ घालून भाजी:

१. चणाडाळ/ तुरडाळ धुवून तासभर भिजत घाला.

२. एक ते दोन शिराळे स्वच्छ धुवून व शिरा तासून घ्या. मधे कापून आवडीप्रमाणे तुकडे करून घ्या.

३. कांदा बारीक चिरून घ्या.

४. कढईत तेल तापवून राई-जीरे, हिंग (चणाडाळ पोटाला बाधू‌ नये म्हणून टाकतात), कढीपत्ता, एखादी हिरवी मिरची आणि कांदा परतून‌ घ्या. लगेचच मीठ, रोजच्या वापरातील घरगुती मसाला आणि हळद टाकून कांदा शिजू द्या. हवे तर झाकणावर पाणी घालून एक वाफ काढा.

५. शिराळा आणि चणाडाळ किंवा तुरडाळ टाकून परतून घ्या. त्यात जितका रस्सा हवा त्या प्रमाणात गरम पाणी घाला. जास्त पाणी घालून बेचव करू नका. परत वाफेवर पाणी घालून शिजवून घ्या..

शिराळा चणाडाळ/ तुरडाळ भाजी तयार!

अशाच प्रकारे वाल-शिराळा, मुग शिराळा भाजी बनवू शकता. मुग शिराळा भाजी आम्ही कुकरमधे करतो. एक ते दोन शिट्या करून.

मला आवडते म्हणून मी चिमुटभर साखर किंवा गुळ घालते. तसेच अगदी जरासे लिंबू पिळते आणि कोथिंबीर ही भुरभुरवते. अर्थात आवडत असल्यास तुम्ही घालून पाहू शकता.

—————————————————————

• शिराळा-बटाटा-टाॅमेटो

गरम तेलात राई ची फोडणी करा. कांदा परतून घ्या आणि मीठ, हळद, रोजच्या वापराचा मसाला टाकून परतून घ्या. कापलेला शिराळा आणि बटाटा टाकून गरम पाणी टाकून परता. झाकणावर वाफेवर पाणी ठेऊन शिजवा. शेवटी टाॅमेटोचे तुकडे घालून शिजवा.

गरमागरम भातसोबत कालवून खायला छान लागते भाजी.

—————————————————————

• शिराळाच्या शिरांची कुरकुरीत चटणी!

शिराळाची भाजी करताना त्याच्या शिरांना काढून घ्यावे व बारीक करून घ्या. मीठ व चिमुटभर हळद व साखर घाला. तेल तापवून, त्यावर राई-जीरे-हिंग ची फोडणी द्यावी व खरपूस तळावे. लिंबूरस पिळावा व कोथिंबीर टाकून शिराळाच्या शिरांची चटणी/कोशिंबीर सर्व्ह करावी. काहीजण तीळही घालतात थोडेसे.

—————————————————————

• शिराळा कोलंबी

आमच्या पट्ट्यात कोलंबी, करंदी वैगरे मास्यांचे काही प्रकार निरनिराळ्या भाज्या टाकून बनवले जातात. आणि खरेच छान लागतात. शिराळ्यात कोलंबी टाकून ‌बनवताना त्यात आले लसूण पेस्ट घालतो आम्ही…

कढईत तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या.‌ आलेलसूण पेस्ट घाला आणि मग मीठ, रोजच्या वापरातील मसाला घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.

लगेच सालासकट साफ केलेली कोलंबी टाकून मोठ्या आचेवर परता. आणि कापलेले शिराळ्याचे तुकडे टाका. सगळे परत परतून घ्या.‌ आणि पाणी टाकून वाफेवर शिजवा.

चिंचेचा कोळ कुस्करून तो भाजीत टाका. अजून पाच दहा मिनिटे शिजवा. भाकरीसोबत चांगली लागते ही भाजी.

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#simple_food#maharashtrian_food#laxmimasaleedwan#themasalabazaar#spices_virar#shrawan_special

Leave a Reply