You are currently viewing हळदीच्या पानातले लुसलुशीत पातोळे

हळदीच्या पानातले लुसलुशीत पातोळे

नागपंचमी पासून श्रावणातील सर्व सणांना आणि व्रतवैकल्यांना सुरूवात होते. शेतकरी प्रामुख्याने हा शेतीपूरक सण छानच साजरा करतात. लहानपणी एडवणला नागपंचमीच्या दिवशी बहुधा रिमझिम पाऊस असायचा. मस्त पावसाळी वातावरण. आजूबाजूला हिरवेगार. फुलझाडे ही बहरलेली असायची… देवघरात डोकावलो कि मम्मी मस्त एकाग्रतेने, पाटावर तांदळाचे, गव्हाचे, कुंकवाचे, हळदीचे, चंदनाचे आणि रक्तचंदनाचे नाग आणि त्यांची पिल्लावळ रेखाटताना दिसायची. मस्त उदबत्तीच्या दरवळ आणि मंद तेजस्वी तेवणारा दिवा. रंगबिरंगी निरनिराळ्या प्रकारची फुले भरलेला थाळ. मम्मीने ब-याच प्रकारच्या फुलांची बाग फुलवली आहे. म्हणून बरीच फुले देवपुजेला मिळतात.

आमच्याकडे गौरी, गणपती, लक्ष्मीपुजन, गुढीपाडवा अशा आणि अनेक सणासुदीला, शुभकार्यात फुलांसोबतच पाने आणि झाडांचा वापर हमखास करतात. त्याच प्रमाणे नागपंचमीला एक तेरड्याचे रोप देखिल मुळासकट वाहतात. मग ही साग्रसंगीत चाललेली पुजा पाहिली कि पटापट आंघोळ करून मीदेखील हजर होत असे नाग रेखाटायला. आजोबांनी मथाणे ह्या आमच्या मुळ गावी ब-याच वर्षांपुर्वी कुणा दानशुराने गावाला आवडीने दिलेल्या जागेवर ग्रामस्थांसाठी शंकराचे मंदिर बांधलेले आहे. तिथे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पुजा करण्याच्या निमित्ताने मम्मी आवर्जून जाते. गावातील अनेक जणही खास शंकराच्या पिंडीवरील नागाचे पुजन करून, लाह्या दुध दाखवून, धुप-उदबत्ती दाखवून मंदिराचे आवार प्रसन्न ठेवतात. मंदिरात गेल्याने अनेकांच्या भेटीगाठी होतात, सुगंधी फुले- उदबत्त्या यांच्या सुगंधाने चैतन्यमय वाटते मनाला. तुपाचे दिवे, गाभा-यातील मंद जेवणारे नंदादीप, रंगबिरंगी फुले पाहून डोळे निवतात! प्रसन्न असते सारे…‌

श्रध्दा अंधश्रध्दा ह्यापलिकडे हे देवबाप्पा च्या नाना प्रकारच्या रचना, पुजा, प्रथा आणि कलापुर्ण मांडण्या आणि श्रावणी वातावरण नकळत्या वयातदेखिल निखळ आनंद देत. चौरंगावर मस्तपैकी बसून लयबध्द् पोथी वाचणे हादेखिल Storytelling part मला भयंकर आवडत असे. मी आवडीने व्रतवैकल्याचे पुस्तक घेऊन मोठ्याने पोथी वाचत असे. त्यातून कळाले कि आज का भाज्या कापू, चिरू किंवा तळू नये तर गंमत म्हणून ते Follow करायलाही आवडत असे. त्यानिमित्ताने जेवणास उकडून बनवता येईल अशा पदार्थांची उजळणी होते सा-यांची, आणि नवनविन पदार्थ ही मिळतात बनवायला असे मला वाटते. आज नागपंचमीच्या दिवशी भाज्या कापणे, चिरणे, तळणे हे सारे वर्ज्य मानले जाते कारण “संपूर्ण चातुर्मास” ह्या प्रत्येक मराठमोळ्या घरात जपलेल्या पुस्तकातील नागपंचमीच्या कथेत दिसून येईल. कारणाशिवाय ह्यावर वादविवाद करणारे पाहिले कि वाईट वाटते. प्रथा-परंपरा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मला वाटते. काहींसाठी ते मानसिक आणि त्यायोगे शारीरिक आणि अर्थातच कौटुंबिक सौख्य सुरळीत राहण्यास मदत करणारे ठरते. 🌿❤️

नागपंचमी ला देवबाप्पाला मस्त नैवेद्य दाखवला जातो. वेगवेगळ्या ठिकाणांनुसार वेगवेगळे नैवेद्य केले जातात.‌ आमच्याकडे मम्मी, एडवणला लाह्या आणि दुध किंवा शेवई खीर आणि क्वचित उकडीचे मोदक किंवा वालाचे मुटगे नागपंचमीच्या नागाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. तर विरारला आई रव्याच्या उकडीच्या करंज्या, मोदक किंवा नेव-या बनवते. काही वर्षांपूर्वी कोकणाशी जडलेली अशी अजून एक सुरेख पारंपारिक रेसिपी मला कळाली. “हळदीच्या पानातले पातोळे!”

पातोळे कोकणात बहुतेक ठिकाणी नागपंचमीचा नैवेद्य म्हणून आजच्या दिवशी घरोघरी बनवली जाते. आईला हा प्रकार माहिती होताच. एकदा माझ्यासाठी म्हणून तीने खास बनवून दाखवलाही. मला जवळजवळ मोदकासारखाच वाटला हा चवीला. हे पातोळे दोन-तीन प्रकारे करतात.

उकडलेल्या पीठाची पातोळी: (अंदाजाने घ्या.)

तांदूळ पीठ (बासमती किंवा आंबेमोहर छान लागते)

• पाणी

• तूप

• दुध

• काजू पिस्ता बारीक कापून

• खवलेला नारळ

• गुळ

• वेलचीपूड

• मीठ

• जराशी साखर

मोदकांसाठी करतो तशीच तांदळाच्या पीठाची उकड काढून घ्या. म्हणजे एका पातेल्यात पाणी उकळवत ठेवा. उकळले की एक मोठा चमचा साजूक तुप आणि किंचित मीठ. आणि शेवटी पटकन सुगंधित तांदळाचे पीठ घालून कलथ्याने कालवून घ्या. गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवा. थोडे वाफू द्या. (जेवढे वाटी पाणी घेणार, तेवढेच पीठ)

पीठ परातीत घ्या. हाताला तूप लावून दुध घालत मऊसर मस्त मळून घ्या. हवे तर केसराच्या दुधात भिजवलेल्या काड्या मळताना घाला. मस्त केसरी छटा येते. आकार द्यायचा नाहीए म्हणून सैलसर पीठ ठेवा.

मग पुरण बनवण्यासाठी खसखस आणि खवलेला ताजा शुभ्र नारळ थोड्याशा तुपावर परतून घ्या. त्यात निमपट किंवा आवडीप्रमाणे खिसलेला गुळ टाकून विरघळवा. बारीक कापलेला सुका मेवा‌ आणि वेलचीपूड टाकून मस्त ढवळा आणि सारण तयार! नागपंचमीची न कापणे चिरणे आण असल्याने त्यादिवसासाठी हे आदल्यादिवशी च करावे लागते बरे का. मग Fridge मधे ठेऊन दुस-या दिवशी वापरू शकता.

मग हळदीच्या ताज्या पानांना पाणी- तुपाचा हात लावून हाताने लांबट आकार दीलेले पीठ पसरतात आणि त्यावर सारण आणि अर्ध्या पानाला म्हणजेच मधोमध दुमडून/ वाळून ठेवायचे. अशाप्रकारे सगळ्या पानांमधे मस्त पीठ आणि सारण भरून वाळून ठेवा. आणि १०-१५ मिनीटे मोदकाच्या उकडपात्रात व्यवस्थित लावून वाफवून घ्या. झाकण काढताच मस्त हळदीच्या पानाचा संमिश्रीत सुगंध दरवळेल. देवबाप्पा ला नैवेद्य द्या आणि तुम्हीही आस्वाद घ्या.

__________________________________

दुसरा आणि ख-या पारंपरिक प्रकारे पातोळी करायची पद्धत जी मला मैत्रिणी ने सांगितली त्यात दुध पाणी, मीठ घालून उकळवून तूप घालावे. मग तांदूळ पीठ घालून अगदी पातळ असे गुठळी नसलेले मऊसर मळून घ्या.

मग हळदीच्या पानावर हे पातळसर मिश्रण थापा आणि वर सारण पसरून भरा. पान वाळून जरासे corners दाबून ठेवा. आणि उकडून घ्या. मस्त पातोळ्या तयार!

Please note:

Write up is just to highlight how we perform Nagpanchami in our culture. We do not meant to promote superstition. Faith is what we love to retain! ❤️🙏

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला ‘Like’ करा.

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com

#नागपंचमी#patole#nagpanchami#festivals_maharashtrian#festivals#ukad#snehaeuphoria#edwan#home#kokan

Leave a Reply