You are currently viewing श्रावणातील नवधारी भेंडी/ श्रावणभेंडी

श्रावणातील नवधारी भेंडी/ श्रावणभेंडी

श्रावणात आणि अजून एक-दोन महिने अनेक ठिकाणी गावरान नवधारी भेंडी मुबलक प्रमाणात मिळते. काही ठिकाणी लांब भेंडी तर कुठे बुटक्या प्रकारातील भेंडी आढळते. कापल्यावर जास्तीत जास्त भेंडींना सुरेख नऊ कातर दिसतात. काहींना कमी पण असतात. गणपतीला नैवेद्य दाखवताना, ॠषीच्या भाजीत वैगरे देखील वापरतात. आमच्याकडे गणपतीतील नैवैद्य्यातील पाच भाज्यांमधे नवधारी भेंडीचा मान असतो. हे गावठी स्वरूपाचे वाण समजले जाते. चव सुध्दा आपल्या रोजच्या भेंडी पेक्षा छान असते. आणि रंग गडद हिरवा नसून पोपटी. किड देखील कमीच किंवा क्वचितच दिसते. भेंडीचे बियाणे शेतकरी जपून ठेवतात आणि पुढल्या वर्षी पावसाची चाहूल लागली की बियाणे पेरतात. मग गणपतीदरम्यान नवधारी भेंडीची लज्जत अनुभवता येते.

नैवेद्य्याला भाजी बनवताना, तेलावर हिंग- राई- जीरे फोडणी दिली की उभ्या चिरलेल्या मिरच्या, चार पाच कढीपत्ता पाने परतवून लगेच चिरलेली भेंडी टाकून परतायची. मीठ, हळद मिसळायचे आणि तीन- चार आमसुले आणि ताजे खोवलेले खोबरे टाकायचे. वाफेवर शिजवायची गरज नाही. पटकन शिजते. मऊ असल्याने जास्त न परतणे चांगले नाहीतर गिच्चा होतो. मध्यम आचेवर पटकन आणि छान होते.

जेव्हा नैवेद्य नसतो तेव्हा फोडणी नंतर तीन-चार लसणीच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा परतवून भेंडी आणि मसाला घालून पण अप्रतिम भाजी होते.

भरलेली भेंडी नवधारी भेंडीची देखील चविष्ट लागते. मोठ्या आकाराच्या भेंडीमधे सारण छान स्टफिंग होते.

आमच्याकडे खाडीच्या कोलंबट (लहान टवटवीत चविष्ट कोलंबी) मधे नवधारी भेंडीचे मोठ्या आकाराचे‌ तुकडे टाकून भाजी करतात. भाकरी किंवा चिंचकढी- भात आणि कोलंबट- नवधारी भेंडीची भाजी हे अगदी soul satisfying winning combo आहे. ह्याची चव ज्याने चाखली असेल तो नक्कीच सांगेल कसले भन्नाट लागते ते. आणि भेंडी देखील अजिबात चिकट लागत नाही.

{आणि हो, ह्या मोठ्या आकाराच्या नवधारी भेंडीचे block printing सारखे‌ रंगाचे छापे कागदावर किंवा कपड्यावर पण भारी उठून येतात. (Bold and sharp print)}

#नवधारी#नवधारीभेंडी#गावठी_वाण#भेंडीचीभाजी

Leave a Reply