You are currently viewing वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

वालाचे भिरडे /वालाची उसळ/ बिरडे/ बिर्डे

वाल, पावटे किंवा डाळिंब्या अशा अनेक नावाने ओळखले जाणारे वाल बहुतांशी सर्वांनाच आवडतात. पोटास बाधतात किंवा पचनास जड म्हणून काही हात राखूनच खातात. वालाचे भिरडे (बिरडे) अनेक जण अनेक प्रकारे करतात. आमच्याकडची मम्मीच्या पध्द्तीची, जराशी वेगळी आणि माझ्या बहिणीची अत्यंत आवडीच्या अशा बिरड्याची पध्दत तुम्हाला सांगते. खुप चमचमीत लागते हे! तांदूळाची भाकरी, मुगाची खिचडी, ताकाची कढी, पापड आणि वालाचं बिरडं हे आमच्याकडचे आवडते Combination आणि पावसाळी वातावरणात तर हे अजूनच चविष्ट लागते.

– सोललेले कळीदार अखंड असे ३०० ग्रॅम वाल (कडवे वाल)

– स्पेशल वाडवळी मसाला दोन चमचे/ किंवा रोजच्या वापरातील मसाला

– सेलम हळद पावडर अर्धा चमचा

– धणा- जीरा पावडर अर्धा चमचा

– काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा

– दोन मोठे कांदे बारीक कापलेले

– चारपाच कढीपत्ता पाने

– बारीक चिरलेली कोथिंबीर

– आले लसूण वाटण एक चमचा

– चवीपुरते मीठ आणि चिमुटभर साखर किंवा गुळ

– तेल

– अर्धा इंच तज, दोन लवंगा, दोन हिरव्या वेलची, एक तमालपत्र, एक मसाला वेलची

– थोड्याशा चिंचेच्या कोळाचे पाणी किंवा ३-४ कोकम

– वाटीभर ताजा खवलेला नारळ अगदी महीन असा मिक्सरमधून बारीक करायचा.

फोडणीसाठी मोहरी, जीरे आणि हिंग

बिरड्याला सुरूवात करताना जाड बुडाचे भांडे उत्तम आणि मध्यम आचेवर बनवावे लागते म्हणून वेळ लागतो.

– वालाच्या बिरड्यासाठी छान टपोरे सोललेले व अखंड वाल स्वच्छ धुवून घ्या.

– कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे आणि हिंग यांची खमंग फोडणी करून घ्या. खडे मसाले परतून घ्या. कढीपत्ता व आलेलसूण पेस्ट टाका. बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.

२. वाडवळी किंवा घरगुती मसाला दोन चमचे, सेलम हळद पावडर अर्धा चमचा, काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा, धणा जीरा पावडर अर्धा चमचा, मीठ, साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा. आणि सोललेले वालाचे टपोरे गोळे टाकून अलगद पाच मिनिटे परतावे. अलगद ह्यासाठी की ते फुटू नयेत. अखंड राहावे.

वाल बुडून ब-यापैकी जास्त असे पाणी ओतून परता. वरती झाकणावर वाफेवर पाणी ठेऊन, १५-२० मिनिटे मध्यम आचेवर भाजी शिजू द्यावी.

३. वाफेवर चे झाकण काढून त्यात वाटलेले खोबरे आणि थोड्याशा चिंचेच्या कोळाचे पाणी किंवा कोकमं मिक्स करा. थोडी कोथिंबीर घाला. परत दहा ते पंधरा मिनिटे उकळी काढून वाल शिजले का पहावे. शिजले नसल्यास परत थोडा वेळ वाफेवर ठेवावे. जास्त ढवळू नये.

तयार वाफाळत्या चमचमीत भिरड्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावा आणि ह्या पावसाळी वातावरणात भाकरी किंवा भाताबरोबर भुरक्या मारत आस्वाद घ्या.

टिप:

१. वाल वातुळ असल्याने ते बाधू नयेत म्हणून कणभर हिंग जास्त टाका. व जास्त प्रमाणात खाऊ नये.

२. चिंच/ कोकम आधी टाकल्यास वाल शिजण्यास अजून अवकाश होईल.

३. आवडत असल्यास तुम्ही पाण्याच्या जागी निव्वळ नारळाचे दूध वापरून देखिल बिरडे करू शकता. छान चव येते.

४. अनेक जण बिरडे गोडा मसाला वापरून बनवतात. तेदेखील चविष्ट असते.

#valache_bhirade#वाल#maharashtrian_recipe#marathmole#fieldbeans#broadbeans#butterbeans#kadave_vaal#laxmi_masale#laxmi_masale_edwan#edwan#virar#themasalabazaar#the_masala_bazaar

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला ‘Like’ करा.

Leave a Reply