पारंपारिक डाळिंब्या वालाचे “मुटगे”- उपलब्ध साहित्यात सहज बनवता येईल असा चविष्ट पदार्थ!
पावसाळ्यातील संध्याकाळच्या भुकेला उत्तम पर्याय, गरमागरम आले-वेलचीच्या चहासोबत….
अथांग समुद्रकिनारी वसलेल्या, नारळा-केळींच्या बागांनी बहरलेल्या मथाणे गावी आमचे आजोळ! मे महिन्याची सुट्टी आणि गणपतीबाप्पा साठी आम्ही सारी भाचरे आवर्जून तिथे हजर व्हायचो… खुप धमाल असायची. त्यात गणपती पावसाळा संपता संपता यायचे. मुळत:च सुंदर मथाणे गाव, यावेळेस अजूनच आल्हाददायक भासायचे. दीड दिवसांच्या गणपतीला सारे जवळचे नातलग,आजूबाजूचे काही लोक पंगतीला असायचे.
आमच्या दोन्ही मामी सुगरण त्यामुळे नैवेद्य अगदी खास ठरलेला असायचा बरे का आमच्या गणपतीबाप्पाला! वरण भात, ऋषीची भाजी, उकडीचा भलामोठा मोदक, चटपटीत चिंच लावलेली अळूवडी, पुरी, बटाटा भाजी, डाळिंब्या वालाची भाजी आणि आज आपण ज्या सोप्या खास पदार्थांची कृती पाहणार आहोत ते डाळिंब्या वालाचे “मुटगे” आणि आम्ही घरी ह्या पदार्थाला कडव्या वालाचे मुठे बोलतो!
तर असे हे पौष्टिक चविष्ट मुटगे झट के पट होतात आणि बच्चेकंपनी कसली की त्याहीपेक्षा वेगाने संपतात. मुटग्याची ही पाककृती मी माझ्या मम्मीकडून घेतली आहे.
साहित्य पाहुयात काय काय लागणार आहे.
– तांदळाचे पीठ दोन वाटी
– सोललेले वाटीभर डाळिंबी वाल,
– चवीपुरता मीठ,
– चिमुटभर साखर,
– थोडीशी हळद व हिंग,
– बारीक चिरलेला कांदा,
– बारीक चिरलेली कोथिंबीर,
– बारीक चिरलेली मिरची व कढीपत्ता पाने,
– आले लसूण पेस्ट (ऐच्छिक)
– तेल व पाणी
– एका लिंबाचा रस
– केळीचे पान
कडवे वाल रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी साले काढून धुवून ठेवा. सोललेले वाल थोड्याशा पाण्यात मीठ घालून पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. थोडे मऊसर होतील.
मग तांदळाच्या पीठाला, थोडे तेल व मीठ घातलेल्या गरम पाण्यात भागवून, मोदकासाठी काढतो तशी उकड काढून घ्या. पसरट परातीमधे उकड काढा व उरलेले सर्व साहित्य मिसळा व तेलाचा हात लावून मस्त मऊसर मळा. मग पंधरा मिनिटे पीठ उमलण्यास ठेवा.
तोपर्यंत मोदकपात्र तयार करून गॅस वर ठेवा. उकड काढायच्या जाळीदार भांड्याला तेलाचा हात लावून ठेवा. केळीचे पान पसरवा.
आता मुटगे वाळण्यासाठी तेलाच्या हाताने मळलेल्या पीठाचा एक गोळा करा व एका हाताच्या तळहातावर घेवून दाब देऊन चपटा करून चार बोटे हलकेच दाबा. मुठीमधे दाबून मुठीच्या आकारत वळवलेला विशिष्ट आकार म्हणून ह्याला मुटगे वा मुठे संबोधतात.
तर असे करत सारे मुटगे बनवून मोदकपात्रात दहा ते पंधरा मिनिटे वाफेवर उकडून घ्या. भांड्यातून काढून मस्त वाफाळते मुटगे टाॅमेटो साॅस किंवा ओल्या चटणी सोबत खाण्यासाठी वाढा. संध्याकाळी गरमागरम आले-वेलची चहा सोबत तर खायची रंगत अजूनच वाढते.
आवडत असल्यास तुम्ही मुटग्यांवर तेलात तडतडलेल्या बारीक मोहरी व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा तडका पण देऊ शकता.
नक्की बनवून पहा हा पारंपरिक पदार्थ पण आमच्याकडच्या वाडवळ सोमवंशी पध्दतीने!
#मुटगे#मुठे#वाडवळी_पदार्थ#maharashtrian_food#marathmole_padarth#mutage#muthe