You are currently viewing नारळाच्या दुधातील डाळिंबी भात आणि टाॅमेटो सार

नारळाच्या दुधातील डाळिंबी भात आणि टाॅमेटो सार

ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि गुलाबी थंडी अशा हव्याहव्याशा वातावरणात भुकही उत्तम लागते. त्यात जर का गरमागरम टाॅमेटो-सार आणि चविष्ट असा डाळिंब्या भात खायला मिळाला तर दुप्पट मज्जा येते, नाही का! हे दोन्ही पदार्थ अगदी सगळ्यांच्या परिचयाचे पण पुलाव-बिर्याणी नादात डाळिंब्या थोडा विस्मरणात गेला आणि ब्रेड क्रुटाॅनस् टाकून,‌ अमुल बटरमधले टाॅमेटो सुप वरचेवर बनते मग टाॅमेटो सार जरा कमीच बनू लागले.

काही जणांना वाटते कि एवढे साधे पदार्थ का बरे पोस्ट करतात करणारे…. पण Trust me कधीकधी काही पोस्ट वाचल्या कि अनेकांना पदार्थ परत आठवतात आणि पुनश्च सहजपणे त्यांच्या मनात आणि अर्थातच स्वयंपाकघरात दरवळ उठतो.

मला स्वत:ला छान टपोरे, अखंड असे डाळिंब्या वाल आवडतात. कडवे वालही बोलतो आम्ही. आमच्या पालघर परिसरात उत्कृष्ट दर्जाचे वाळवलेले कडवे वाल मिळतात. अगदी चेचलेले, मुके वाल काढून साफ केलेले वर्षभर साठवण्यास. त्यामुळे डाळिंब्या वापरून निरनिराळ्या पदार्थांची प्रत्येक मौसमात रेलचेल असते. वालाची उसळ, बिरडे, मुटगे/ मुठे, वाल-बटाटा सुकी भाजी. तुपाची धार सोडलेला वाफाळता डाळिंब्या भात, तळलेली कुरडई आणि जीरा-तुपाच्या फोडणीचा टाॅमेटोचे सार! बस्स!

साजूक तुप is a must! साजूक तुपाचा मोलाचा वाटा आहे दोन्ही पदार्थांमधे….

• डाळिंब्या_भात

आपल्याला लागणार आहे:

• नारळाच्या अर्ध्या वाटीच्या खवलेल्या चवाचे घट्ट दूध

• ताजे सोललेले पण अखंड डाळिंब्या/ वाल

• बारीक चिरलेली कोथिंबीर

• बारीक चिरलेला एक मोठा कांदा

• दीड वाटी तांदूळ धुवून पाणी निथळून‌ अर्धा तास ठेवा

• कढीपत्ता

• दोन उभी चिर पाडलेल्या हिरव्या मिरच्या

• फोडणी पुरता मोहरी, जिरे, हिंग

• चार काळेमिरे, दोन‌ लवंग, एक तमालपत्र, दीड इंच दालचिनी, दोन हिरव्या वेलची, एक मसाला वेलची

• पाऊण चमचा गोडा मसाला

• अर्धा चमचा गरम मसाला

• पाव चमचा सेलम हळद

• मीठ

• लिंबू रस

मी डाळिंबी भात कुकरला करते. तुम्ही कढईत किंवा इतर भांड्यामधे करू शकता. ती पध्द्त खाली लिहीली आहे.

१. गॅसवर तापलेल्या कुकरच्या भांड्यात तेल घालून त्यात खडे मसाले टाकून एक ते दोन मिनिटे तडतडू द्या. उभी चिर मारलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता परतून घ्या. उभा चिरलेला कांदा टाकून कांदा शिजेस्तोवर चांगले परता.

२. मीठ, गोडा मसाला, गरम मसाला, हळद टाकून दोन-तीन मिनिटे मसाला जरा कच्चेपण जाईल इतपत परता. लगेचच सोललेल्या डाळिंब्या पाण्यातून काढून ह्यात मिसळा. डाळिंब्या हलक्या हाताने मिसळून घ्या. लिंबू रस व कोथिंबीर पेरा व परतून घ्या. कोथिंबीर ची सुरेख चव येते भाताला…

३. निथळून ठेवलेला भात ह्यामधे घालून जरा मोठ्या आचेवर चमच्याने फिरवत परता. गॅस मध्यम करून त्यात गरम करत ठेवलेले बेताचे पाणी आणि नारळाचे घट्ट दुध घालून सर्व अलगद फिरवून घ्या. आम्ही दीड पेर बोट वर असे पाणी-नारळदुध मिश्रण ठेवतो. म्हणजे तयार झाल्यावर लगदा होत नाही. छान मोकळा भात होतो. एक उकळी आली ह्या सगळ्याला कि तीन शिट्या करून घ्या.

४. कुकरचे झाकण काढून थोडी कोथिंबीर हलक्या हाताने मिसळून घ्या. वाढताना वर ताजे खवलेले खोबरे आणि कोथिंबीर भुरभुरावा. एक पळी साजूक तुप वाढा. अफलातून लागतो पहा. सुगंधही मंद पण उत्तम…

• टाॅमेटो सार:

हेदेखील वेगवेगळ्या पध्दतीने करतात. काही नंतर नारळाचे दुध घालतात तर काही सर्व घटक एकत्र वाटतात. मी आपली माझी झटपट पध्द्त देते. टाॅमेटो आणि ताजी गावठी कोथिंबीर घरचीच म्हणजे फ्लॅटमधल्या खिडकीतल्या किचन गार्डनची होती. तर अशी ही, एक दोन घरची आणि बाकी बाजारातून हुडकून आणलेली लालेलाल, मोठी रसाळ टाॅमेटो… 😀 टाॅमेटो उत्तम दर्जाची असली तरच सार छान होते.

आपल्याला लागणार आहे:

• चार रसाळ टाॅमेटो

• दीड वाटी ताजे खवलेले खोबरे

• आल्याचा लहानसा तुकडा

• अर्धा बारीक चिरलेला कांदा

• पाच सहा लसूण पाकळ्या

• कढीपत्ता चार पाच पाने

• साजूक तुप

• जीरे

• चिमुटभर साखर

• बारीक चिरलेली कोथिंबीर

• मीठ

• तमालपत्र (मी तजच्या झाडांची कोवळी पाने पण वापरली), चार पाच काळेमिरे आणि आवडत असल्यास लहानसा दालचिनीचा तुकडा

१. सार बनवताना टाॅमेटोचे तुकडे करून त्यांना बेताच्या पाण्यामधे सहा-सात मिनिटे उकळवते. थंड झाल्यावर सालासकट मिक्सरच्या भांड्यामधे टाकते. त्यात कांदा, लसूण, आले, कढीपत्त्याची एक दोन पाने, एखादी हिरवी मिरची आणि खवलेले खोबरे टाकते.‌ दोन तीन काळीमिरे देखील टाकते. काळेमिरे चा हलकासा हवाहवासा तिखटसर स्वाद येतो. तिखट सहन होत नसल्यास मिरची मिरे टाकू नका. पाणी बेताचे असू देते. हे सारे मिश्रण अगदी गंधासारखे गुळगुळीत व्यवस्थित भरडून घेते. स्वच्छ कपड्यातून गाळून घेते.

२. कढईत जरासे तेल व ब-यापैकी साजूक तुप ओतून काळेमिरे व जीरे तडतडवते. तीन चार कढीपत्त्याची पाने, चार पाकळ्या बारीक चिरलेला लसूण तडक्यावर लालसर होईपर्यंत परतते. मग लगेचच गाळलेले मिश्रण कढईत घालून ढवळते. गरजेनुसार पाणी वाढवते. तमालपत्र टाकते.

३. मीठ, साखर घालून चांगले थोडे दाट होईपर्यंत उकळवते. कोथिंबीर टाकून मग गॅस बंद करते.

अगदी लालसर रंग हवा असल्यास एखादा लहान तुकडा बीट आपण घालू शकतो. टाॅमेटो कमी वेळ उकळवले आहेत म्हणून कच्चेपणा जाईस्तोवर सार उकळवणे गरजेचे आहे.

मस्त टाॅमेटोसार आणि डाळिंब्या भात आस्वादास तयार!

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#डाळिंब्या#डाळिंब्याभात#वाल#टाॅमेटो#टाॅमेटोसार#तुप#साजूकतुप#dalimbyabhaat#tomatosaar#maharashtrian_food#maharashtrian#food#marathi

Leave a Reply