You are currently viewing दुधी बटाटा शेंगदाण्याची आमटी

दुधी बटाटा शेंगदाण्याची आमटी

#दुधी_बटाटा_शेंगदाण्याची_आमटी

#वाडवळ_स्पेशल

दुधी-बटाट्याचा शेंगदाणे टाकलेला रस्सा हा प्रकार तसे पहायला गेले तर अगदी साधासुधा जेवणातला पदार्थ. पण हाच दुधी-बटाटा विशिष्ट वाडवळी पध्दतीने भिजवलेला शेंगदाणा घालून केला तर त्याची अप्रतिम चव रस्स्यामधे उत्तम उतरते. पुर्वी वाडवळांच्या लग्नांच्या पंगती बसत तेव्हा अननसाची आमटी किंवा दुधी-बटाट्याची आमटी हमखास असे.

मम्मी ही दुध्याची आमटी उत्तमच बनवते. लहानपणी अशाच कोसळत्या पावसात, डोळ्यांवर पेंग चढावी अशा धुंद पावसाळी वातावरणात, दुपारच्या जेवणाला मऊमऊ वाफाळता भात‌ आणि त्यावर हा गरमागरम आमटीतला रस्सा कालवून घेतलेला घास आणि दाताखाली येणारा शेंगदाणा फारच मस्त लागत असे. ❤️ दुधी, शिराळा, गलका, पडवळं ह्या भाज्या एडवण-मथाणे आणि आमच्या भागात अगदी मुबलक… त्यामुळे वेगवेगळ्या घरगुती पण चविष्ट भाज्यांचे प्रकार आमच्या पट्ट्यात केले जातात. त्यातलीच ही आमटी. चांगले कोवळे आणि ताज्जे-ताज्जे असे मांडवातून नुकतेच काढलेले दुधी वापरून ही दुध्याची भाजी केली तर अजूनच मज्जा येते. आमटी करायला सोपी असते आणि वाडवळी स्वयंपाकघरात अगदी वरचेवर सहज होते. आम्ही कशी बनवतो ते सांगते.

१. एक दुधी: स्वच्छ धुवून, साले काढून‌ चौकोनी फोडी केलेला

२. दोन बटाटे: बटाटे स्वच्छ धुवून, साले न काढताच चौकोनी फोडी केलेला

३. दोन कांदे: बारीक चिरून

४. आलेलसूण पेस्ट

५. एक मोठा टाॅमेटो बारीक चिरून (आजकल टाकतात. मुख्य पाककृती मधे वापर सहसा केला जात नाही.)

६. वाटीभर शेंगदाणे (३-४ तास भिजवून ठेवा. छान नरम व्हायला हवेत. मी ताज्या भुईमूगाच्या शेंगातले दाणे वापरले त्यामुळे भिजवायची गरज लागली नाही.) किंवा शेंगदाणा कुट: अर्धी वाटी (ऐच्छिक)

मसाल्याचे पदार्थ:

८. सेलम हळद पावडर: अर्धा चमचा

९. स्पेशल वाडवळी मसाला: एक ते दीड चमचा ( तुम्ही तुमच्या रोजच्या वापराचा मसाला टाकू शकता)

१०. गोडा/ ब्राम्हणी मसाला: अर्धा चमचा

११. चवीनुसार मीठ

१२. चिंच थोडीशी पाण्यात कोळ काढून (टाॅमेटो असूनही थोडीशी चिंच चवीकरता वापरली आहे.)

१३. गुळ: थोडासा

१४. दालचिनी दोन लहान तुकडे

१५. लवंग २-३ नग

१६. एखादे तमालपत्र

१७. काळेमिरे: ८-९

१८. राई

१९. जीरे

२०. थोडेसे बेसन

१. एका कढईत किंवा कुकरमध्ये तेल तापवत ठेवा. चांगले तापले कि त्यात दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळेमिरे, कढीपत्ता, एखादी मिरची, राई-जी-याची फोडणी करा. छान तडतडले कि लगेच बारीक चिरलेला कांदा अगदी पारदर्शक होईस्तोवर शिजवून घ्या.

२. त्यात गोडा ब्राम्हणी गोडा मसाला, वाडवळी मसाला, हळद, मीठ, किसलेला गुळ, दाण्याचे कुट टाकून छान परतून घ्या. तेल जरा वेगळे होऊ लागले म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला.

३. आता बटाट्याच्या फोडी, शेंगदाणे, दुधी टाकून परतून घ्या. टाॅमेटो आणि चिंचेचा कोळ टाका. थोडेसे बेसन पातळ करून लावा.

४. थोडे पाणी गरम करून ते ह्यात टाकून ढवळून घ्या.

५. कुकरला लावले असेल तर दोन शिट्या करून घ्या. आणि भांड्यात करत असाल तर झाकणावर पाणी ठेऊन वाफेवर आमटी चांगली शिजवून घ्या.

मस्त हलका दरवळ पसरवत ही साधीशी आमटी तय्यार झाली असेल. दाण्याच्या कुटामुळे जरासा जाडसर रसदेखील तयार झाला असेल. ❤️ कोथिंबीर वैगरे सजवणूकीची भानगड जास्त कोणीही करत नाही पण तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर नक्कीच वरून पेरा.

चपाती, भाकरी आणि वाफाळता भात, कशाबरोबरही उत्तम लागते ही दुधी-बटाटा-शेंगदाण्याची आमटी! ह्या पावसाळ्यात जमल्यास नक्की बनवून सगळ्यांना वाढा. शेंगदाणे वेचून वेचून खा मस्तपैकी… आवडेलच ही खात्री आहेच. बस्स बनवलीच ही आमटी तर मनात भरली का चव ते कळवायला विसरू नका… 🌿❤️

आणि हो! घरचा दुधीचा मांडव पाहिला का?!

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#दुध्याची_आमटी#bottlegourd#dudhi#lauki

#vadval#shengadana_aamti

Leave a Reply