You are currently viewing दरवळणारा मसालेभात!

दरवळणारा मसालेभात!

जुनीच पोस्ट पण आज खास मसाले भाताच्या ओल्या भरडलेल्या मसाल्यासाठी लिहीलेय. हा अगदी ताजा बनवावा लागतो तो मसाला! अगदी सोपा तरीही जादूई जणू…गोडा मसाला, हळद आणि ह्या मसाल्यांची भरड… आणि जो दरवळतो मसाला-भात… बस्स… असे अजूनही कोणते दरवळ वाढवणारे खास मसाले असतील तर नक्की लिहा. म्हणजे आम्हाला देखील बनवून अनुभूती घेता येईल.

मराठमोळ्या स्वयंपाकघरात सणासुदीला किंवा खास कार्यक्रमांना आवर्जून बनवला जाणारा‌ भाताचा एक प्रकार… सणासुदीलाच नाही पण लग्नाच्या पंगतीत देखील सुवासिक मसालेभाताचा मान! केळीच्या हिरव्यागार पानावर वाढलेला तो दरवळणारा वाफाळता मसालेभात, त्यावर घरीच कढवलेल्या साजूक तुपाची धार, ताजे खवलेले शुभ्र गोडगोड खोबरे आणि बागेतली ताजी हिरवीगार कोथिंबीर! (जेव्हा नैवेद्यासाठी नसतो तेव्हा वरून भुरभुरवलेला थोडासा कुरकुरीत बिरीस्ता म्हणजेच तळलेला कांदा पण छान लागतो.) पहिल्याच घासाला मनाला भावलेल्या चविष्टपणाची अनुभूती येतेच.

तसा हा मसालेभात बनवायला सोपा.‌ जास्त क्लिष्ट पाककृती च्या पाय-या नाहीत. पण चव पुलाव, बिर्याणी, खिचडी किंवा फोडणी भात ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी. हा बनवायला सुरुवात केली तरी अगदी तडक्यापासूनच ह्याचा घमघमणारा सुगंध स्वयंपाकघरातच नाही तर घराबाहेरही दरवळतो! ही असते ह्यात मुख्यत: वापरल्या जाणा-या अख्ख्या साबुत भारतीय मसाल्यांची आणि खोबरे, तीळ असलेल्या गोड्या मसाल्याची अनोखी कमाल… मी स्वत: हा भात आई रश्मी इंदूलकरकडून शिकली. आम्ही कामकाजावरून घरी परतलो कि दरवाज्याबाहेर येणा-या मसालेभाताच्या सुगंधावरूनच अचुक ओळखत असू कि आईने आज ह्या पदार्थाचा बेत केला आहे. गुढीपाडवा किंवा दस-या दिवशी, पुर्ण बेतामधे समावेश असतो, पुरी, बटाटा भाजी, टाॅमेटोचे सार, कुरडई, खमंग काकडी, वांग्याचे भरीत, शिरा आणि हा लज्जतदार मसालाभात!

मसालेभात जेव्हा सणासुदीला करतात तेव्हा त्यात कांदा, लसूण वापरले जात नाही. कारण देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. बाकी वेळा आमच्याकडे कांदा लसूण घालतात बनवताना…‌ चव अजूनच चांगली लागते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मसालेभात हा बहुतांश ठिकाणी फक्त उभ्या चिरलेल्या तोंडली वापरून करतात. आम्ही काही वेळा तोंडली किंवा मटार वापरून करतो. काहीजण गाजराचे तुकडे, टाॅमेटो देखील घालतात मसालेभात बनवताना….‌ प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रमाणे त्यात बदल होतात.

साहित्य अगदी रोजच्या वापरातील आहे. पहा काय काय लागते आपल्याला…जवळपास ५-६ जणांना पुरेल हा:

१. कढीपत्ता ८-१० पाने २. उभा कापलेला कांदा

३. काजू दोन तुकडे केलेले ४. मनूका थोड्याशा

५. कोथिंबीर बारीक चिरून ६. खवलेले ताजे खोबरे

७. दोन प्याले तांदूळ (खास दिवसासठी बनवताना तुम्ही बासमती वापरू शकता‌. पण मी जास्त वेळा वाडा सुरती कोलम किंवा रोजच्या वापरातील तांदूळ घेते.)

८. अर्धा चमचा गोडा मसाला ९. सेलम हळद पावडर पाव चमचा १०. चिमुटभर साखर किंवा गुळाचा लहान तुकडा

११. लिंबू पाव भाग १२. मीठ चवीनुसार १३. साजूक तूप १४. तेल १५. वाफवलेले मटार किंवा उभी चिरलेली तोंडली

ओल्या ताज्या मसाला भरडसाठी:

(हे सगळे अख्खे मसाले हलकेच १ मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर, ओले मसाल्यांसोबत एकत्र करून मिक्सरला फिरवून ‘भरड’ काढून घ्या. बारीक पुड नको.)

आले अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, एखादी हिरवी मिरची, हिरवी वेलची २, ५. दालचिनी अर्धा इंच तुकडा, मसाला वेलची १, तमालपत्र २, बादियान १, लवंग २, काळे मिरे ५-६, तीळ पाऊण चमचा, खवलेले खोबरे थोडेसे, बडीशेप पाव चमचा, धणे अर्धा चमचा

अख्खे मसाले: (तडक्यासाठी)

मसाला वेलची ३, तमालपत्र २, लवंगा ५, काळे मिरे ५, दालचिनी १ इंच तुकडा, बादियान २, जायवंत्री १, शहाजीरे पाव चमचा, हिरवी वेलची ४, राई अगदी जराशी, हिंग पाव चमचा, जीरे पाव चमचा

आम्ही जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या कुकरला करतो. कुकरला केला कि एक ते दोन शिटीमधे होतो.

१. प्रथम एक जाड बुडाचे मोठे गॅसवर ठेवून त्यात तेल आणि थोडे तुप घालून गरम झाले कि लगेचच तडक्यासाठी ठेवलेले अख्खे मसाले टाकून परतले. त्यावर कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा टाकून, कांदा पारदर्शक होईस्तोवर परतून शिजू द्यायचा.

२. चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाकून परतून काजू आणि बेदाणे टाकले आणि वाफवलेले मटार किंवा उभी चिरलेली तोंडली किंवा दोन्ही पण टाकू शकतो. (मटार शक्यतो कोवळी नसल्यास थोडी वाफवतो, कारण अर्धकच्ची राहिल्यास अजिबात चांगली लागत नाही.)

३. जी अख्खे मसाले आणि ओल्या पदार्थांची भरड केली आहे ती ह्यात टाकून चमच्याने व्यवस्थित परतले की आता स्वयंपाकघरात घमघमाट सुटला असेल ह्याबाबत शंकाच नाही. हा सुगंध हेच खुप खास आहे मसालेभात बाबत, असे किमान मला तरी वाट्टे…

४. तयार मसाल्याची भरड कांद्यावर परतून झाली नीट की थोडी कोथिंबीर आणि लगेचच धुवून घेतलेला तांदूळ त्यात घालतो. (आम्ही मसालेभातासाठी तांदूळ भिजवून ठेवत नाहीत. तुम्हाला हवे असल्यास ठेऊ शकता.) तांदूळ अगदी चार- पाच मिनिटे छान परतते. आणि गरम पाणी अंदाजाने बेताचे ओतते. भात मोकळा झाला पाहिजे. जास्त टाकले तर सगळेच फसेल आणि कमी टाकले तर करपेल. म्हणून काळजीपूर्वक टाकावे. सगळे एकदा ढवळून, एक चमचा साजूक तुप घालून झाकण लावा आणि मध्यम आचेवर शिजवा‌. झाकणावर पाणी ठेवा. सगळा भात शिजतानाच फुलला पाहिजे. अगदी मोकळा होत नाही हा. पण खिचडी प्रकारही नाही. (कुकर असेल तर दोन शिटीमधे मसालेभात होतो.)

झाकण काढले कि मसालेभात तय्यार! एकदा हलक्या हाताने ढवळा आणि मस्त ताजे खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वाढा. परत एकदा तुपाची सढळ धार… ताकाची कढी, टाॅमेटोचे सार, सोबतीला पापड किंवा कुरडई अफलातून लागते. खानेवाला मनसे दुवा देगा और आप हमे 😀

मसालेभात घरोघरी वेगवेगळ्या छानछान पध्दतीने अनेक सुगरणी बनवतातच पण हा आईने बनवलेला आणि मला स्वत:ला आवडलेला मला भावला म्हणून साग्रसंगीत लिहला.

To be very frank, ह्या सा-या मारूतीच्या शेपटासारख्या लांबच लांब घटकांची यादी पाहून अनेकांना त्या भानगडीत पडू नये असे वाटेल पण नीट वाचले तर लक्षात येईल साधे घरच्या घरी उपलब्ध घटक आहेत. काही जण अगदी थोडे अख्खे मसाले, गोडा मसाला आणि गरम मसाला एवढ्या मोजक्या साहित्यांत पण झटपट मसालेभात करतात. तोदेखील छानच लागतो. पण मी जेव्हा हा मसालेभात खाल्ला आणि दिलेल्या घटकांना वापरून पाय-यांमधे बनवला तेव्हा सुगंध आणि चवीच्या बाबतीत तो खरेच वेगळीच अनुभूती देऊन गेला.

#masalabhat#maharashtrian_food#foodwelove#मसालेभात#soulfood#edwan#virar

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

Leave a Reply