दोन दिवसांपासून थंडी जाणवायला लागली आहे. थंडीमध्ये गरमागरम आस्वाद घ्यावा असे जिरे-मिरे चिकन आमच्याकडे बनवतात. अगदी भन्नाट चवीचे, सौम्य तिखट असे हे जीरे-मिरे चिकन! बनवायला सोपेच!
शक्यतो गावठी चिकनचे तुकडे वापरायचे. काळे मीठ आणि जीरा-काळेमिरे पावडर आणि हळद पावडर चिकनला लावून ठेवायचे. जरा अर्धा तास झाकून ठेवायचे. थोडा कढीपत्ता टाकून ठेवायचा आणि आवडत असल्यास बटाट्याचे तुकडे. आमच्या पालघर पट्ट्यात फार आवडीने मटण-चिकन मधला बटाटा खाल्ला जातो.
फोडणीला तुपात वेलदोडा, जीरे, दोन-तीन लवंगा, तज (दालचिनी) तुकडा, काळे मिरे तडतडवायचे. बारीक चिरलेला कांदा परतायचा.
आले-लसूण- भरपुर कोथिंबीर- सुके खोबरे- मिरच्या यांना बारीक वाटून हिरवीगार पेस्ट बनवायची. ती पेस्ट ह्या फोडणीत टाकायची. छान शिजले की मीठ टाकून परतायचे आणि चिकन घालून व्यवस्थित मिक्स करायचे.
बेताचे गरम पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र सढळ हस्ते घालायची.
कुकरला करणार असाल तर तीन-चार शिट्या किंवा जाड बुडाच्या पॅनमधे झाकणावर पाणी ठेवून वाफेवर शिजवायचे. तयार झाल्यावर उत्तम लागते. काळसर रंगाचे चिकन होते. छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जरासा लिंबाचा रस पिळायचा आणि गरमागरम भाकरी किंवा मऊ मऊ आंबेमोहोर भात आणि वाफाळत्या चिंचकढीसोबत आस्वाद घ्यायचा.
थंडीमध्ये खायला तर अजून मज्जा येते!
#चिकन#जीरेमिरेचिकन#chickenrecipes#chicken#nonvegrecipes#india#maharashtrian#food#simplefood#foodfrompalghar#palghar#edwan#foodblogger#cuminseeds#blackpepper