You are currently viewing चिकन- सुरण मसाला- सुक्का

चिकन- सुरण मसाला- सुक्का

आमच्या वाडवळ म्हणजेच सोमवंशी क्षत्रिय समाजात चिकन आणि मटणाच्या भाजीत किंवा सुक्क्यामधे बटाटे फोडी घालतात. बटाटे भाजी वाढवायला वैगरे घालतात कि काय असे इतर जाती- धर्मींयांना वाटणे स्वाभाविक आहे. But trust me, चिकन किंवा मटणाच्या रस्स्यात मुरलेल्या बटाट्याची फोड निव्वळ जबरदस्त लागते. अनेकांचा तर‌ मटणाच्या फोडीपेक्षा बटाट्याची फोड वाढा म्हणून आग्रह असतो. बटाट्याप्रमाणेच अनेक वाडवळांकडे चिकन मधे सुरण देखील घालतात. परसबागेत किंवा वाड्यामध्ये वर्षानुवर्षे सुरणाचे मोठाले कंद तयार होत असतातच त्यामुळे सुरणाचा वापर जेवणात असतो.

परवा आमची निकितादिदी सहजच चिकन मधल्या बटाटा आणि सुरणाच्या फोडीबाबत बोलली, तेव्हा बटाट्याच्या फोडींच्या जागी सुरण घालून चिकन बनवायची हुक्की आली. वाडवळ सुरण वापरून वेगवेगळ्या पध्दतीने चिकन बनवतात. मी अगदी पारंपरिक बनवले नाही परंतु पारंपरिक पाककृती प्रमाणे देखील उत्तम चवीचे बनते. तव्यावर चमच्याने फिरवून काढलेल्या भाकरींसोबत छान लागते.

चिकन- सुरण मसाला- सुक्का:

जाड बुडाच्या भांड्यात साजूक तुपावर वेलची, दालचिनी, लवंग, काळे मिरे, जीरे, एखादी मसाला वेलची तडतडवायचे. आले लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला अर्धा कांदा परतून घ्यायचे. दोन मध्यम आकाराचे कांदे‌ आणि दोन टाॅमेटो मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि तेदेखील व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ, लक्ष्मी‌ मसालेचा आमचा मटण-चिकन मसाला घालून परतून घेतले. (वाडवळी मसाला किंवा घरचा रोजचा वापराचा मसाला वापरू शकता.) चिकन टाकून मग वाफेवर पाणी ठेवून १५-२० शिजवून घ्यायचे. नंतर सुरणाचे तुकडे टाकून परत शिजवून घ्यायचे‌. सुरणाची खाज येऊन घशाला खवखव होऊ नये म्हणून अर्ध्या लिंबाचा रस आणि भरपुर कोथिंबीर घालून एकदा वरखाली करायचे.

भाकरी किंवा चिंचकढी- वाफाळत्या भातासोबत वाढायचे. पावसाळ्यात तर हे प्रकरण अजूनच चविष्ट लागते. (पारंपरिक रस्सा भाजी असते.)

#सुरण#चिकनसुरण

Leave a Reply