You are currently viewing चिंचेचे कच्चे सारं आणि चिंचकढी/ चिंचेचे सार

चिंचेचे कच्चे सारं आणि चिंचकढी/ चिंचेचे सार

आमच्याकडे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधी सुक्के चिकन, मटण किंवा सुक्या मासळीचे प्रकार बनवले कि भातावर घ्यायला वरण, डाळ वैगरे प्रकार केले जात नाहीत तेव्हा झटपट होणारी चटपट चवीची चिंचेची चिंचकढी भातावर घेऊन खायला जबरदस्त लागते आणि हे सार अगदी पटकन होते. रोज रोज वरण, कढी खाऊन कंटाळा आला तर वेगळे म्हणून करून पहा.

ही चिंचकढी दोन पध्द्तीने बनवतात. एक कच्चे चिंचेचे सार आणि दुसरी उकळी आणून कढवलेली चिंचेची कढी.

विरार आगाशी आणि वसई पट्ट्यातील काही वाडवळ महिला अप्रतिम अशी चिंचकढी/ चिंचवटी करण्यात माहिर आहेत.

• कच्चे सार:

माझ्या वसईच्याच्या ओजस्वी (मुळची वसई) वहिनीकडून कच्च्या साराची पाककृती घेतली. झटपट होणारे हे कच्चे सार अप्रतिम बनवते ती… तीने सांगितल्याप्रमाणेच बनवले पण मी त्यात अगदी किंचित हळद आणि मिरची पावडर देखील घातली. तुम्ही बनवताना पारंपरिक चवीसाठी ती वगळू शकता.

– एक कांदा उभा पातळ किंवा अगदी बारीक चिरून

– एक ते दोन मिरच्या (तिखटाचे प्रमाण कितपत हवे त्यानुसार)

– कोथिंबीर बारीक चिरून

– चवीनुसार मीठ

– गुळ किसून

– चिंचेच्या कोळाचे पाणी

– पातीचा कांदा

चिंचेच्या कोळाचे पाणी सोडून बाकी सगळे एका खोलगट भांड्यात एकत्र करायचे आणि छान कुस्करायचे. कांद्याचे पाणी सुटेल आणि इतरही स्वाद एकत्र उतरतील. त्यानंतर चिंचेच्या कोळाचे पाणी टाकायचे. आणि ढवळायचे. झटपट होणारे चटपटीत चिंचेचे सार अगदी जबरदस्त लागते. चिकन मटण असो वा मासे, भातावर सार घेऊन प्यायला किंवा नुसतेच वाटीभर प्यायला मस्त लागते चव.

• चिंचकढी

आपण आज उकळी देऊन केलेली चिंचकढी पाहणार आहोत.

मुळातच कोकम (आमसुले) किंवा लिंबाच्या तुलनेत आम्हा वाडवळांच्या जेवणात चिंचेचा वापर जास्त केला जातो. माकूणसार, शिरगाव, अलिबाग भागात छान मीठाचे खडे लावून बनवलेले काळ्या उत्कृष्ट दर्जाची, चिंचोके आणि दोरे काढून साफ केलेली चिंच मिळते.

पुर्वीच्या काळी कोठीच्या म्हणजेच साठवणूकीच्या अंधा-या खोलीत मोठेमोठे मातीचे घडे असत त्यात हे चिंचेचे गोळे वर्षभरासाठी भरून ठेवले जात. लहानपणी गुरगुट्या गाभुळलेल्या चिंचा खायला मज्जा यायची, मोठे होत गेलो तसे चिंचेचा एक चिंचकढी सोडली तर फारसा संबंध राहीला नाही. चिंचकढी आणि मऊसर भाताचा पहिलाच घास, मनाला एडवणच्या घरी अलवार पोहोचवतो.

तसेच आम्हा काही वाडवळांमधे चिकन किंवा मटणामधे बटाट्याच्या फोडी टाकतात. मटणाच्या खड्याइतक्याच आवडीने रस्सा मुरलेल्या बटाट्याच्या फोडी चिंचकढी भाताबरोबर ताव मारून खाल्ल्या जातात.

माझी सुगरण मामी उत्तम चिंचकढी बनवते म्हणून ही रेसिपी तिच्याकडून खास घेतली आहे. ढोबळमानाने अशी पध्द्त थोड्याबहुत फरकाने वापरली जाते.

चिंचकढीसाठी आपल्याला खालील साहित्य लागते:

– मुठभर आंबट चिंचेच्या कोळाचे पाणी

– पातळ उभा लांबट चिरलेला कांदा

– कढीपत्ता

– दोन-तीन बारीक चिरलेल्या मिरच्या

– आलेलसूण पेस्ट

– थोडासा गुळ

– चवीपुरते मीठ

– बारीक चिरलेली कोथिंबीर

– सेलम हळद पावडर

१. बारीक उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ एका भांड्यात घेऊन जोर लावून कुस्करावे.

२. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यामधे तेल गरम करा. लगेचच अगदी थोड्याशा राई जीरा-हिंगाची फोडणी करा. त्यात हे कुस्करलेले मिश्रण आणि आले-लसूण परतवा, थोडेसे शिजवा आणि चिंचेचे पाणी आणि गुळ टाका.

३. मस्त उकळी येऊ द्या आणि बघा ही चटपटीत चिंचकढी झालीसुध्दा तय्यार!

गावी आवणी/ रोपणी च्या शेवटच्या दिवशी काही मालक हौसेने चिकन रस्सा देतात आवणी मजुरांना तेव्हादेखील भातावर वाढायला आवर्जून चिंचकढी बनवतात. Combination अगदी झक्कास लागते बघा!

काहीवेळा लग्नातील तिखटजेवणावेळी सुक्के चिकन, मटण रस्सा, चिकन तंदूरी, भातासोबत चिंचकढी ठेवतात. सुके मासे वापरून केलेल्या पदार्थांनाही चिंचकढी उत्तम चविष्ट साथ देते.

#tamarind#tamarind_saar#tamarind_indianfood#food#indianfood#maharashtrian_food#chinch#chinchkadhi

#कच्चे_सार#chinchkadhi

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

अशाच वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती आणि निरनिराळ्या मसाल्यांच्या माहितीसाठी खालील लिंकला ‘Like’ करा. 💁♥️🌿

https://www.facebook.com/themasalabazaarstore/

आणि आमच्या Official Website ला नक्की भेट द्या.

www.themasalabazaar.com

Leave a Reply