You are currently viewing कोल्हापुरी मटकी मिसळ

कोल्हापुरी मटकी मिसळ

कोल्हापुरी कांदालसूण मसाला वापरून, घरच्या पद्धतीने बनवलेली मिसळ! 🙂

तर कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जितका प्रसिद्ध तेवढीच तिथली मिसळ जागतिक असते, असे अनेकदा म्हटले जाते! चमचमीत वाफाळती मिसळ, वरती चिवडा फरसाण, कांदा आणि कोथिंबीर आणि त्यावर रसरशीत कटाची झणझणीत चव, अन त्यात बुडवून पाव खायचा, म्हणजे अगदीच भन्नाट प्रकार! कोल्हापुर म्हणजे हौशी लोकांनी भरलेले… नवे नवे म्हणताना कधी आपलेसे झाले कळालेच नाही. हो आणि लग्नानंतर अभिषेकसोबत कोल्हापूर फिरत होते तेव्हाच अंदाज येत होता आधीपासूनच ऐकिवात असलेला कोल्हापूरचा ठायीठायी आढळणारा खव्वय्येपणा! आणि लहानमोठ्या अगदी सगळ्याच कट्ट्यापासून, हाॅटेलमधून दिसून येत होता. कोल्हापुरी संस्कृतीदेखील ऐटबाज‌ आणि हौशी… कोल्हापूरी मिसळ, हिंदुस्तान बेकरी, ताजे बेकरी पदार्थ, मिल्क काॅर्नर, कंदी पेढा, तांबडा-पांढरा रस्सा, राजाभाऊंची भेळ, अख्खा मसूर, मस्त भन्नाट सोलंकीचा फालुदा आणि फ्रुटसलाड आणि बरेच काही “कोल्हापूर स्पेशल” म्हणून मनात गर केलेले…. नुस्ते भटकून कोल्हापूर पहायला देखील मज्जा येते.

दर वर्षी गणपतीसाठी कोल्हापूर घरी जातो तेव्हा आवर्जून कोल्हापूर मधील निरनिराळे मिसळ चे कट्टे आवर्जून पालथे घालतो. पावाच्या लादी जागी जो ब्रेड दिला जातो ते मला आवडते. गावरान मिसळ, चुलीवरच्या मिसळ, कांदा-खोबरे वाटण लावलेल्या मिसळ, स्मोकी फ्लेवरच्या दम लावलेल्या मिसळ असे सर्वच प्रकार चवीला थोडेबहूत वेगळे पण छान लागतात.

तर अशी ही मिसळ असते साधीशीच पण सारेच काही एकदम प्रेमानं करावं लागते बरे का! तरच आणि तेव्हाच तो झणझणीतपणा अन तो तर्रंरीदार रंग त्या मिसळीत उतरतो. आणि ह्या साध्याशा पदार्थांची चव मनात रेंगाळत राहते. आम्हाला मिसळ आवडते म्हणून आई आवर्जून मिसळ घरीदेखील अनेकदा बनवते. तिच्या हातची भन्नाट मिसळ अणि कट म्हणजे माझा अगदी जीव की प्राण….

तर ही आधीचीच कोल्हापुरी मिसळची सोपीशी रेसिपी मस्त कोल्हापूरी कांदालसूण मसाला वापरून…. पावसाळा सुरू झालेय तेव्हा छानशा वातावरणात सहजच कधीतरी बनवून आस्वाद घ्या गरमागरम मिसळ पाव आणि आले-वेलची-चहापातीच्या वाफाळत्या चहाचा! ह्याआधीच्या पोस्ट मधे कोल्हापुरी कांदालसूण मसाल्याचे प्रमाण दिले आहेच. किंवा तुम्ही बाजारातून सहज मिळणारा कांदालसूण मसाला वापरू शकता.

मटकी मिसळ साठी आपल्याला लागणार आहे:

१. भिजवलेली छोटे मोड आलेली मटकी,

२. उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे,

३. बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो,

४. बारीक चिरलेली कोथिंबीर,

५. लिंबू,

६. तळण्यासाठी तेल,

७. आले लसूण पेस्ट,

८. मीठ,

९. चिमुटभर साखर,

१०. सेलम हळद,

११. कोल्हापूरी कांदालसूण मिसळ मसाला

१२. गरम मसाला,

१३. मिक्स फरसाण आणि

१४. थोडासा जाड पोह्यांचा चिवडा.

मटकी बनवायला सुरुवात करूया:

१. भिजवलेली मटकी कूकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावी.

२. एका कढईत तेल गरम करून, जीरे, राई, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करावी.

३. मग बारीक चिरलेला कांदा, आलेलसूण पेस्ट आणि टाॅमेटो छान परता, तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवा आणि मग मीठ, चिमुटभर साखर, सेलम हळद, कोल्हापूरी कांदालसूण मिसळ मसाला व गरम मसाला शिजवून घ्या.

४. शिजवलेली मटकी घालून, आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून उकळी काढा. बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. आणि लिंबू रस पिळून छान सगळी मिसळ मिक्स करा.

कोल्हापूरी कांदालसूण मसाल्यामुळे चमचमीत तिखट अशी मस्त कोल्हापूरी मिसळ बनते.

आपण मिसळमधून देखील कट बनवू शकतो पण आई मुद्दाम कट वेगळा बनवते. हा कट आपण कटवडा बनवण्यासाठी देखील वापरू शकतो.

कट बनवण्यासाठी तेलावर जीरे, राई, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करा. मग बारीक चिरलेला कांदा, आलेलसूण पेस्ट आणि टाॅमेटो छान परतून तेल सुटेपर्यंत शिजवा. कोल्हापूरी कांदालसूण मसाला आणि काश्मिरी मिरची पावडर टाका. लिंबू पिळून आणा गरम पाणी घालून उकळी घ्या. कट तयार!

मिसळ आणि कट तयार झाला की खोलगट सर्व्हिंग प्लेटमधे एक मोठा चमचा मिसळ घालावी. मटकी जास्त असू द्या. त्यावर एक डाव कट घालावा. त्यावर उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे, चिवडा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालावे. लिंबू पिळावा (आधी पिळला नसल्यास). चमचमीत मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर किंवा पावासोबत कोल्हापूर ला स्मरत मिटक्या मारत खावी. ❤️

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#kolhapuri_kandalasun_masala#misalmasala#misal#Maharashtrian_food#kitchen#spice#kolhapur#kolhapur

Leave a Reply