You are currently viewing कुरकुरीत सुके बोंबील & सुक्या बोंबलाचा ठेचा

कुरकुरीत सुके बोंबील & सुक्या बोंबलाचा ठेचा

सुकी मच्छी, कधी ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. पावसाळ्यात विशेषतः बोटी समुद्रात जात नाहीत त्यावेळेस आवर्जून वापरू शकतो. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही, कारण एक प्रकारचा वास येतो. पण ताज्या आणि योग्य सुकवलेल्या असल्या तर जेवण बनवल्यानंतर अजिबात दर्प येत नाही. दर्जेदार सुकी मासळी ही खात्रीलायक कोळीणींकडूनच घेतली तर चांगली मिळते.

भाकरी, गुरगुटा मऊसर भात, चिंचेचे सार, बटाटा किंवा वांगी घालून केलेली सुकी मच्छीची रस्सा भाजी, कांद्यात करपवून केलेल्या बोंबील किंवा सुकटीची सुकी भाजी आणि सुक्या बोंबलाचा ठेचा, कोलीम किंवा बोंबलाचे लोणचे आणि सफेद कांदा यांचा समावेश परिपुर्ण चविष्ट आणि so called flavour packed थाळी बनवतो. मस्त पावसाळी वातावरणात हे सुक्या मास्यांचे पदार्थ जणू अजूनच चटकदार लागतात. ☀️🌿💁

पदार्थ १: कुरकुरीत सुके बोंबील:

साफ केलेले सुके बोंबील घेऊन त्याचे दोन तुकडे करा. गरम पाण्यात पंधरा मिनिटे भिजवून ठेवा. चांगले स्वच्छ आणि मऊ होतील. पाणी काढून बोंबील पिळून टाका. आणि आलेलसूण पेस्ट, मीठ, रोजच्या वापराचा वाडवळी मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा कोळी मसाला एकत्र करून ते बोंबीलाच्या तूकड्यांना व्यवस्थित लावून घ्या. तवा गरम करून त्यात तेल ओता, कढीपत्ता तडतडवा आणि त्यात हे बोंबील कुरकुरीत होईपर्यंत छान तळा.

सर्व्ह करताना त्यावर लिंबू पिळून मग बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर भुरभुरवा. 🙂

पदार्थ २: मांसाहारी ठेचा प्रकार : सुक्या बोंबलाचा ठेचा

हा साधासोपा सुक्या बोंबलाचा ठेचा बनवतात कसा… आपल्याला लागणार आहेत दहा सुके बोंबिल, पाच तिखट हिरव्या मिरच्या, दहा बारा लसूण पाकळ्या, मीठ, आवडत असल्यास लिंबाचा रस.

बोंबील गॅसवर किंवा चुलीमधे अगदी खरपुस आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. थंड झाल्यावर मधोमध चिरुन काटा काढून टाका. हातानेच तोडत बोंबलाचे लहान लहान तुकडे करा. आता मोठ्या खलबत्त्यात किंवा पाटा वरवंटयामधे बोंबलाचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे, लसुण पाकळ्या, लिंबू रस, मीठ सारे टाकून बारीक सर ठेचून घ्या. वरवंटा वैगरे नसल्यास हलकेच मिक्सरमध्ये फिरवा.

अफलातून चवीचा हा सुक्या बोंबलाचा ठेचा तांदळाची भाकरी, वाफाळता भात आणि साधी रस्सा भाजी बरोबर अप्रतिम लागतो.

आमच्या एडवण गावातील बंदरावर शंकराचे देखणे मंदिर आहे. बाजूला‌ धक्का आहे, जिथे बोटी लागतात. खाली आणि बांबूवर मासे सुकण्यासाठी लावले जातात. बोंबील, करंदी, बांगडे, घर, खेकडे, कोलंबी सर्व उन्हात सुकत असते. शेकड्यावर मोजमाप केले‌ जाते. सुक्या बोंबलांची तोंडे एकात एक अडकवून‌ चवड रचली जाते.

सहज म्हणून फोटो सोबत पोस्ट केले आहेत.

Leave a Reply