काकडीची पानगी
दोन गावठी काकड्या किसून घेतल्या आणि एक सफेद कांदा बारीक उभा कापून घेतला. तेलावर बारीक चिरलेली आले- मिरची, जीरे, हिंग फोडणी केली. कांदा आणि काकडी अगदी अर्ध्या मिनिटासाठी परतली आणि पाणी घातले. छान मिसळले. जराशी हळद, चवीपुरते मीठ आणि किंचित साखर ढवळून घेतली. त्यातच लिंबू रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. उकळी येताच गॅस मंद करून त्यात भागेल असे तांदळाचे पीठ घालून छान मिसळून घेतले. दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेतले. गॅस बंद केला. थोडा वेळ झाकण तसेच ठेवले.
केळीची पाने धुवून पुसून घेतली. चौकोनी तुकडे करून एका बाजूने थोडे तेल लावून घेतले. पानावर मधोमध मध्यम आकाराचा भागवलेल्या पीठाचा गोळा ठेवून साधारण भाकरीच्या जाडीचा थापून घेतला. वरून दुसरे पान लावले. आणि लोखंडी तव्यावर दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घेतले.
काकडी- कांदा किसाची छान पानगी तयार झाली. केळीच्या पानांचा स्वाद आणि दरवळ खाताना जाणवतो. पानगीसोबत ताजे बनवलेले घरचे कैरीचे लोणचे अप्रतिम लागते.