सुकी मासळी म्हणून वापरण्यात येणाऱ्या पदार्थांत करंदी आणि बोंबील मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. करंजीच्या अनेक प्रकारामधली एक म्हणजे करंदी भरलेले वांगे किंवा सुकटीचे वांगे. करायला अगदी सोपी आणि भाकरी किंवा वाफळत्या भाताबरोबर चविष्ट लागते. ही पाककृती आई रश्मी इंदूलकर कडून घेतली आहे.
वांग्याचे काप आणि करंदी अशी भाजीही सर्रास करतात पण पाहुणे आल्यावर किंवा आवड म्हणून हे करंदी स्टफ केलेले वांगे आकर्षक वाटते.
आपल्याला लागणार आहेत;
१. ७-८ वांगी
२. साफ केलेली करंदी एक मोठी वाटी
३. बारीक कापलेले २-३ कांदे
४. आले-लसूण पेस्ट
५. चवीपुरते मीठ
६. २-३ आमसुले
७. बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर
८. रोजच्या वापरातील मसाला
९. कांदा-खोबरे वाटण
• कांदा-खोबरे वाटण:
(कांदा-खोबरे वाटप कसे करायचे पहा. दोन कांदे उभे चिरून घ्या. आणि तेवढेच नारळाचे खवलेले खोबरे घ्या. तेलामधे कांदा अगदी मऊसर होईपर्यंत तळून घ्या आणि मग खोबरे टाका. आणि मिक्स करून घ्या. न करपवता पण चांगले खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर हवे तेवढे काढून, त्यात पाणी घालून मिक्सरला लावून अगदी बारीक करा. आणि भाज्यांमधे वापरा.)
आता कृतीकडे वळूया:
१. पांढरी करंदी साफ करून स्वच्छ धुवून घ्या. पंधरा-वीस मिनिटे भिजवत ठेवा किंवा पाच-दहा मिनिटे गरम पाण्यात उकळा. आणि वांगी स्वच्छ धुवून त्यांना भरल्या वांग्याला पाडतात तशा चिरा पाडा. पाण्यात थोडे मीठ घालून त्यात ठेवा.
२. चिरलेला कांदा, भरपुर कोथिंबीर, रोजचा भाजीचा मसाला, मीठ, आलेलसूण पेस्ट असे सर्व एकत्र करून त्यात भिजत ठेवलेली करंदी पाणी पिळून मग टाका. आणि हाताने व्यवस्थित एकत्र करत मिसळा.
३. चिरा पाडलेल्या वांग्यामधे वर नमुद केलेले करंदीचे मसाला मिश्रण दाबून भरा.
४. कढई किंवा पॅन गरम करून तेलावर थोडा बारीक चिरलेला कांदा, रोजचा मसाला आणि जरासे मीठ टाकून व्यवस्थित शिजू द्या. दोन-तीन आमसुले/कोकम त्यात परतून घ्या. मग त्यात कांदा-खोब-याचे बारीक वाटलेले वाटण टाकून परतून जरा पाच-दहा मिनिटे वाफेवर पाणी ठेऊन शिजू द्या. नंतर ही भरलेली वांगी त्यात अलगद टाकून हलकेच परता आणि झाकणावर पाणी ठेवून वाफेवर शिजू द्या. थोडावेळाने वांग्याची दुसरी बाजू पलटून परत थोडावेळ शिजू द्या.
शिजल्यानंतर भाकरीबरोबर सर्व्ह करा.
– Food Memories Marinated with Love by, स्नेहा चौधरी- इंदूलकर
#dryfish#karandi_vangi#oldpost




