आषाढी एकादशी निमित्ताने उपवासाच्या निरनिराळ्या सोप्या पदार्थ पाककृती संकलन:
“विठूमाऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मुर्ती विठ्ठलाची…. विठ्ठला मायबापा!!!”
दर आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच हे गाणे, घराबाजूच्या साईबाबांच्या मंदिरात दिनविशेष म्हणून लावलेले असे. मम्मीदेखील दिवसभर हे गाणे गुणगुणत असे. आजही हे स्वर कानावर पडले तरी खुप आपलेले वाटतात…
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आणि खास करून वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत! पंढरपूर ची वारी जी लाखोंच्या संख्येने दूरवरून पायी चालत, संयम, जिद्द, भक्ती, श्रध्दा आणि शिस्त यांचे दर्शन घडवत वारकरी आणि भक्तगण पुर्ण करतात. वारीमधे आम्हीदेखील सहभागी होऊन वारीतील निस्वार्थ भक्तगणांच्या श्रध्देचा थरार अनुभवला होता. विठूरायाच्या भक्तीपोटी अनेक मैलाची मजल-दरमजल करत किती कष्टाने वारी पुर्ण करून आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माउली आणि रखमाई चरणी नतमस्तक होतात. एडवण गावातुनही अनेक भक्तजण नित्यनेमाने आवर्जून पंढरपूरची वारी करतात. मनोभावे घरूनच विठ्ठल-रखमाईचे नामस्मरण आणि पुजन करूया. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशीला आईचा एकटीचा पुर्ण दिवसाचा उपवास असतो…. तरीही ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ह्या म्हणीला शब्दशा खरे करत आम्ही घरातले इतरही सगळे उपवास करत नसलो तरी आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्याकडे बनणा-या उपवास्याच्या सात्विक भासणा-या थाळीचा आस्वाद नक्कीच घेतो. उपवासाचे कितीतरी सुरेख, आगळेवेगळे चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ आजकाल हौशी सुगरणी बनवतात. आम्हीदेखील नवनवीन पदार्थ पाहून शिकून बनवतो पण आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र एक टिपिकल उपवास थाळी आम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवतो. त्यात भगर म्हणजेच वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, राताळे-शेंगदाणा भाजी, दही, मिरची-ठेचा, मसाला-ताक असे सहज-सोपे पण चविष्ट पदार्थ असतात. आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, जीरा, मीठ, कढीपत्ता वैगरे खाल्लेला चालतो म्हणून आम्ही त्याचादेखील वापर करतो. तुम्ही वगळू शकता. ह्या पाककृती सगळ्यांनाच जमतात तरीही सहज म्हणून ह्या पाककृती, त्यांचे तडका देऊन केलेले चविष्ट प्रकार आणि काही अजून उपवासाच्या पाककृती खाली देत आहोत. न जाणो कोणाला कधी कामी येतील.
• भगर/ वरीचा भात:
१. भगर स्वच्छ धुवून घ्या. कढईत तुप गरम करून त्यात जीरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता टाकून मस्त फोडणी करा.
चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर टाका.
२. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा.
३. कढईतल्या फोडणीत धुवून घेतलेली भगर टाकून परतून घ्या. आणि मग अंदाजाने गरम पाणी ओतून ढवळा. कोथिंबीर व हवे असल्यास थोडासा लिंबाचा रस पण टाकू शकता.
४. झाकणावर पाणी ठेवून भगर शिजवून घ्या.
चविष्ट भगर तयार!
भगरीचा साधा भात शेंगदाणे आमटी सोबत चांगला लागतो म्हणून आम्ही एकादशीच्या दिवशी तडका न दिलेला भात करतो.
• शेंगदाण्याची आमटी:
१. शेंगदाणे कढईत भाजून घ्या. थंड झाले की साले काढून घ्या.
२. ताजे खवलेले खोबरे, साले काढलेले शेंगदाणे, मीठ, आल्याचा तुकडा, एखादी मिरची हे सारे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्या.
३. कढईत तुप घालून त्यावर जीरे फोडणीला टाकून परतून घ्या. त्यावर शेंगदाणेचे मिश्रण ओतून चांगले परतून घ्या. मीठ, चिमुटभर साखर आणि थोडेसे गरम पाणी ओता. एखाद-दुसरी उकळी आले की गॅस बंद करा.
• शेंगदाणे-राताळ्याची उपवासाची उसळ/ भाजी
राताळ्याचा वापर करून उपवासाला त-हेत-हेचे चविष्ट पदार्थ सहज करता येतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे शेंगदाणे आणि राताळ्याची उपवासाची भाजी! करायला अगदी सोपी असते आणि चवीला मस्त…
त्यातही बाजारात गुलाबी सर-गडद राणी रंगाची गावठी राताळी, गावठी कोथिंबीर आणि ताज्या काढलेल्या भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या तर उत्तमच…
आपल्याला लागणारे साहित्य:
१. तुप किंवा तेल
२. चार-पाच राताळी
३. कढीपत्ता
४. दोन ते तीन मिरच्या
५. सोललेले शेंगदाणे (किंवा शेंगदाणे भिजवलेले)
६. जरासे ताजे खवलेले खोबरे
७. कोथिंबीर
८. मीठ
९. चिमुटभर साखर
१०. जीरे
१. एका कुकरमध्ये तुप किंवा तेल तापवा. जी-याची खमंग फोडणी करा. उभी चिर पाडून मिरची आणि कढीपत्ता टाकून परता. चवीपुरते मीठ, चिमुटभर साखर घाला.
२. स्वच्छ धुतलेल्या रातळ्याची साले काढून राताळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. ते ह्या फोडणीवर टाका. भिजवलेले शेंगदाणे किंवा सोललेले शेंगदाणे टाका. आणि व्यवस्थित परता. आणि एक ते दोन शिटी काढून घ्या.
(जर जास्त घाई नसेल तर तुम्ही कढईमधे वाफेवर ही भाजी सहज करू शकता.)
3. राताळे आणि बटाटे शिजले कि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे खवलेले खोबरे घालून सर्व्ह करा.
ही भाजी मला थोडेसे लिंबू वरून पिळून आणि घट्ट दही घालून खायला आवडते. ह्यावरच तुम्हीदेखील फराळी चिवडा, कुस्करलेले वेफर्स आणि तळलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे टाकून मिसळ बनवून खाऊ शकता.
• ठेचा:
कढईत तेलावर हिरव्या मिरच्या जराशा परतायच्या. त्यातच ओले खोबरे परतून घ्या. मग ह्या मिरच्या, खोबरे खलबत्त्यात घेऊन त्यात शेंगदाणे, मीठ घालून अगदी मस्त ठेचून घ्यायचे. म्हणचे ठेचा तय्यार!
• फोडणीचे ताक:
तुपावर लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जीरे यांची फोडणी करा. मीठ व चिमुटभर साखर टाका. आणि तयार ताक ओतून एखादी उकळी येऊ द्या. ताक फुटणार नाही ह्याची काळजी घ्या. कोथिंबीर टाकले की फोडणीचे ताक तय्यार!
• कच्च्या केळ्याचे काप
हे काप तोंडी लावायला छान लागतात आणि करायलाही अतिशय सोपे असतात….
पाच सहा मोठ्या आकाराची कडक, हिरवीगार केळी स्वच्छ धूवून घ्या. मग सोलाण्याने साले सोलून मधला गर तेवढा घ्या. त्याच्या थोड्या जाडसर अशा लांबट कापा कापून घ्या. कापलेल्या कापांना लगेचच थोडासा तेलाचा हात लावा अन्यथा कापा काळसर पडतील.
थोडेसे मीठ चोळा.
कढईत तेल गरम करून त्यात कापा अगदी कडक होईतोवर तळा. टिश्युपेपरवर काढून तेल निथळले कि केळीच्या पानावर वाढा. वरून थोडीशी काश्मिरी मिरची पावडर आणि ताजी बनवलेली काळे मिरे पावडर भुरभुरावा. बारीक चिरलेली कोवळी कोथिंबीर पण वरून थोडी टाका आणि मस्त आस्वाद घ्या.
• वेलची केळ्याचे गोड:
वसई विरार मधे दर्जेदार जातीवंत अशी खास वेलची केळी मिळतात. आकाराने लहान, चविला गोडसर तर काही विशिष्ट जाती गोड व किंचित आंबटसर अशा असतात. ही केळी कापल्यानंतर मधल्या बाजूला वेलची दाण्यासारख्या नाजूक बिया दिसतात म्हणून या केळीच्या प्रजातीला वेलची केळी म्हणून ओळखत असावेत.
वसई-विरार-आगाशी मधे हिरव्यागार केळीच्या बागा मस्त निरनिराळ्या प्रकारच्या लोंगरांनी लगडलेल्या असतात…वडीलोपार्जीत वाड्यांमधे जातीवंत झाडे अनेक वर्षांपासून उभी आहेत. बहुतेक ठिकाणी अजूनही रसायनांच्या वापराशिवाय (Organic way) केळींचे उत्पादन घेतले जाते.
विरार बाजारात सुरेख ताजी अशी वेलची केळी सहज उपलब्ध होत असल्याने ‘केळीचे गोड’ हा प्रकार आमच्याकडे बहुतेकदा होतो. अगदी साध्या जिन्नसात झटपट होतो. ह्यामधे वापरलेल्या दालचिनीचा हलकासा सुगंध आणि स्वाद उत्तम वाटतो.
चला तर मग पाहूया काय साहित्य लागेल आपल्याला:
१. वेलची केळी ७-८
२. गोड कितपत हवे आहे त्यानुसार साखर किंवा गुळ
३. ताजे खवलेले खोबरे
४. दालचिनी चे दोन ते तीन तुकडे
५. साजूक तूप
१. जाडसर बुडाची कढई गॅसवर मंद आचेवर गरम करा.
२. त्यात साजूक तूप घालून, दालचिनीचे तुकडे टाकून ३-४ मिनीटे परता.
३. थोडेसे खवलेले ताजे खोबरे घालून परता. लगेच गुळ किंवा साखर घालून, ती वितळेपर्यत परतत रहा.
४. साखर/ गुळ वितळले की वेलची केळीची साले काढून, गोल कापा करून मिश्रणात टाकून ५-१० मिनीटे परता.
मस्त सोनेरी रंगावर परतून घ्या. थोडा मऊ आणि जरासा जास्त गरम होतो किंवा हलकासा करपतो तो भाग crispy, असे मस्त लागते खाताना. केळ्यासोबत दालचिनी चा संमिश्र स्वाद छान वाटतो.
वेलची केळी जरा नाजूकशी असल्याने परतताना कुस्करली जातात. पाहुणे आले असता करताना नजाकतीने केल्यास आणि गोलाकार कापा मोठ्या आकाराच्या केल्यास काही प्रमाणात काप अखंड राहतील.
दुस-या जातीची केळी वापरून देखील केळीचे गोड करू शकता. पण वेलची केळी मिळाली तर उत्तमच!
• बटाट्याच्या फिंगर-चिप्स्:
बटाट्याचे फिंगर चिप्स देखील अगदी सहजसोपे, कुणीही बनवू शकेल असे, No-fail recipe आणि चविष्ट म्हणून वारंवार बनवले जातात.
साहित्य:
सहा बटाटे
चवीपुरते मीठ
चिमुटभर साखर
काश्मिरी मिरची पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
बटाटे सोलून स्वच्छ धुवून घ्या. साधारण बोटाच्या जाडीचे उभे चिप्स कापून घ्या. थंड पाण्यात थोडे मीठ घाला, विरघळवा व बटाट्याचे तुकडे १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. १५ मिनीटानंतर बटाट्याचे तुकडे स्वच्छ सुती कापडावर ठेऊन पाणी निथळून जाऊ द्या.
जाड बुडाच्या कढईत तेल गरम करा. बटाट्याच्या कापा मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. थोड्याशा सोनेरी रंगावर तळले गेले, कि टिश्युपेपरवर जास्तीचे तेल शोषण्यासाठी ठेवा. चवीपुरते मीठ, चिमुटभर साखर,
काश्मिरी मिरची पावडर, चिरलेली कोथिंबीर सगळे तळलेल्या बटाट्याच्या फोडींवर टाकून वरखाली करत मिक्स करा.
मस्त गरमागरम सर्व्ह करा. थंडगार दह्याबरोबर खा.
उपवास नसला तरी बनवून खायला तेही टाॅमेटो केच-अप सोबत धम्माल येते.
कधी कधी बटाट्याचे Wedges हा प्रकार पण भारी लागतो चवीला… उपवासासाठी नुस्ते मीठ भुरभुरून खाऊ शकतात. Western side ला प्रसिद्ध असा Potato wedges बनवायला बटाटे विशिष्ट आकारात कापावे लागतात. आणि सालींसकट बरे का! आणि मग मस्त तळले कि वेगवेगळे चमचमीत मेयो साॅस, तिखट आंबट साॅस आणि काळेमिरे, melted cheese, पिरीपिरी मसाला असे लावले कि काय अप्रतिम असा हा बटाटा प्रकार लागतो म्हणून सांगू. बर्गर, पिझ्झा आणि तत्सम पदार्थांसोबत side dish म्हणून Potato Wedges भारीच लागतात. आणि ह्या सालासकटच खातात.
Please note:
Potato finger chips are kept on newspaper for presentation purpose only. It is always good and suggested to put any oily item on tissue paper.
• उपवासाचे पॅटिस:
साहित्य:
तीन उकडलेले बटाटे खिसून
राजगिरा पीठ किंवा साबुदाणा पीठ एक वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी
शेंगदाणे कुट
दोन तीन तिखट मिरच्या
एक इंच आले खिसून
एक लिंबूचा रस
चवीपुरते मीठ
थोडी साखर
जीरे
वरील सारे जिन्नस एकत्र घेऊन थोडे तेल, थोडे तूप व पाणी ह्यांच्या सहाय्याने चांगले मऊसर मळा. जितके जास्त आपण मळतो तितके चविष्ट व हलके होतात पॅटिस.
मग मळलेल्या पीठाच्या गोळ्याला अर्धा तास उमलू द्या. नंतर हाताला तुप लावून एक एक छोटा चपटा गोळा बनवा. उथळ पॅनमधे तुपावर दोन्ही बाजूने खरपुस परतून
हे पॅटिस तळून घ्या.
• उपवासाची चटणी:
खालील प्रमाण आवडीनुसार अंदाजाने घ्या.
बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना
शेंगदाणे कुट
दोन तीन तिखट मिरच्या
एक इंच आले खिसून
ओले खोबरे
एक लिंबूचा रस
चवीपुरते मीठ
थोडी साखर
अमुल दही दीड वाटी
वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. चांगल्या सर्व्हिंगच्या भांड्यात काढा. गरम तुपावर जी-याची खमंग फोडणी करा आणि ह्या चटणीवर मस्त ओतून चरचरू दे. हलकेच मिक्स करा.
उपवासाच्या चटणीबरोबर मस्त गरमागरम पॅटिस सर्व्ह
करा. खुप चविष्ट लागतात.
(Please note: उपवासाला ज्यांच्याकडे कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर वापरत नसतील त्यांनी ती वगळा तसेच मीठाच्या जागी सैधव मीठ वापरू शकता.)
• दुधी हलवा:
दुधीचा हलवा पाककृती आमच्याकडे follow करतात त्या पध्दतीने:
१. दोन ते तीन दुधी स्वच्छ धुवून साले काढून खिसणीच्या मध्यम आकाराच्या पातीवर खिसून घ्या.
काही जण दुधीच्या आतला गाभा व बिया पण काढून टाकतात. पण आजचे दुधी अगदीच कोवळे असल्याने मी आतला मऊसर गाभाही खिसून घेतला.
२. दुधीच्या खिसातून जास्त पाणी निघाल्यास खिस निथळून घेणे.
३. साखर: खिसापेक्षा थोडीशी जास्त
४. बदाम, पिस्ता आणि काजू तुकडे
५. बेदाणे/ मनूके
६. वेलदोडे पूड (optional)
7. ताजा बनवलेला मावा किंवा खिसाच्या दिड पट दुध/ सायीचे दुध
आता बघुया, मस्त घरगुती पध्दतीचा दुधी हलवा बनवायची सोपी पध्दत…आज मी दुधीचे पाणीदेखिल वापरणार होते आणि बनवायचीपण घाई होती म्हणून कुकरचा वापर केला. तुम्ही पॅन किंवा कढई वापरून मंद आचेवर शिजवू शकता.
१. कुकरमध्ये तुप गरम करून घ्या. त्यात मंद आचेवर बेदाणे/मनूका सोडून सोडून काजू, बदाम व पिस्त्याचे काप घालून हलकेसे तळून घ्या आणि डिशमधे काढून घ्या. आता मंद आचेवर अगदी फक्त फुलेपर्यत बेदाणे आणि मनुका हलकेच तळून डिश मधे काढून ठेवा.
२. थोडेसे तुप वाढवा आणि गरम झाले कि दुधीचा खिस टाकून अगदी चांगला परतून घ्या. उरलेले दुधीचे पाणी टाका, थोडे दुध घालून ढवळा आणि झाकण लावून एक शिटी काढून घ्या.
३. शिटीची हवा गेली कि झाकण काढून परत गॅस लावा. मोठ्या आचेवर कुकर ठेऊन त्यात साखर आणि दुध, साय ओता. अगदी नीट माक्स केले कि तळून बाजूला ठेवलेले सुकामेव्याचे काप, बेदाणे आणि अगदी जराशी वेलदोड्याची पुड घाला. वेलदोड्याची पावडर मी शक्यतो टाळते कारण दुधी हलव्याला मस्त स्वत:चा असा सुगंध असतो. उगाच वेलचीचा सुगंध जास्त झाल्यासारखं वाटते.
४. आता गॅसवर हे मिश्रण दुध आटेपर्यत मध्यम आचेवर शिजू द्या. मधेमधे ढवळत रहा. छान आटले कि गॅस बंद करा. हलव्याचा सुगंध दरवळला असेलच.
५. आता चांगल्या डिशमधे सर्व्ह करून आस्वाद घ्या.
हा दुधीचा हलवा गरम किंवा फ्रिजमधे ठेऊन थंड करूनही छान लागतो. फ्रिजमधे ४-५ दिवस टिकतोही.
घरच्या दुधीचा असल्याने, कोण तो आनंद आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ल्यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या ओळीचा अर्थ जाणवला.
• झटपट_नारळवड्या
साध्या पण चविष्ट अशा या गावरान नारळाच्या वड्या अगदी हव्या त्या प्रकारे हव्या त्या चवीच्या झटपट बनवता येतात. लाॅकडाऊन मधे गोड काहीतरी खायची इच्छा कधीना कधी तरी होतेच…. त्यात सर्वच साहित्य उपलब्ध नसल्याने अनेक पाककृती इच्छा असूनही बनवता येत नाहीत. मग तेव्हा हा सोपा आणि अगदी उपलब्ध साहित्यात होणारा नारळवडीचा पर्याय तुम्ही बनवू शकता. उपवासालाही चालतात. लहानसहान sweet cravings साठी एक उत्तम पर्याय!
नारळाचा खवलेला खिस मात्र ताजा आणि शुभ्रच वापरा. ह्या वड्या उपवासासाठी पण खाऊ शकता. मम्मी म्हणजे अस्मिता चौधरीने बनवलेली ही पाककृती आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असू तेव्हा, मम्मी अगदी झटपट वेगवेगळ्या प्रकारच्या नारळवड्या बनवून आम्हाला आणि आमच्या मित्रपरिवारासाठी डब्ब्यात नारळवड्या रचून देत आहे. अगदी दोन तीन दिवसांनी देखील चवीला छान आणि मऊ राहत असत.
साहित्य:
१. दोन वाट्या खवलेला नारळ (शक्यतो शुभ्र नारळाचा खिस)
२. एक ते सव्वा वाटी साखर
३. वेलची पुड
४. चिमुटभर साखर
५. उकडलेला बटाटा बारीक खिसून (ऐच्छिक)
६. पाव वाटी दुध
७. काजू-बदाम तुकडे
८. साजूक तूप
चला नारळवड्यांची कृती पाहूया.
१. जाड बुडाच्या कढईत तुप तापवत ठेवा. त्यात खवलेला नारळाचा खिस आणि उकडलेल्या बटाट्याचा खिस (हा ऐच्छिक आहे. ह्याने वड्या मऊ पडत नाहीत.) घालून दहा मिनिटे परता. खिस सुका पडणार नाही ह्याची काळजी घ्या.
२. लगेचच साखर, चिमुटभर मीठ आणि दुध टाकून व्यवस्थित एकजीव करा.
३. वेलची पावडर आणि काजू-बदाम तुकडे घालून परतून मिसळून घ्या. हे सर्व मंद आचेवर करायचे.
जरा पाच दहा मिनिटे नीट शिजून होऊ द्या. एका ताटाला तुप लावून ठेवा आणि लगेचच हे मिश्रण ताटात काढून वाटीने हलकेच दाब देत समप्रमाणात पसरवून घ्या.
वरून अजून थोडे सुकामेव्याचे तुकडे टाकायचे असल्यास टाकून घ्या. आणि परत वाटीने अलगद दाब द्या. आता लगेचच काप कापून घ्या नाहीतर अगदीच थंड झाल्यावर काप पाडणे कठिण होते.
ह्या ३-४ दिवस किंवा जास्तही बाहेर आरामात चांगल्या राहतात. जास्त दिवस ठेवायचे असल्यास फ्रिजमधे ठेवा.
खुप प्रकार करता येतात ह्या नारळवडीमधे… गुलकंदाची, आमरसाची नारळवडी पण छान लागते. ज्या प्रकारात बनवायची आहे त्याचा रस किंवा ते जिन्नस साखर टाकतो त्यावेळी टाकावे आणि नीट मिसळावे. हापुसच्या आमरसाची तर अफलातून नारळवडी बनते.
• राताळ्याचे काप:
चांगली मोठी एकसारखी राताळी बाजारातून शोधून आणून, स्वच्छ धुवून घ्यायची. माती व्यवस्थित निघाली पाहिजे. सालासकट गोलाकार कापा कापून घ्याव्यात.
पॅनमधे तूप गरम करून त्यात ह्या कापा सोडाव्या. गुळ किंवा साखर वरून पेरावी. दोन्ही बाजूने तूप सोडत खरपुस परतून घ्याव्यात.
मस्त लागतात ह्या गोडसर कापा. :
• राताळ्याचा खिस:
राताळी स्वच्छ धुवून साले काढावीत. आणि पाण्याने भरलेल्या परातीमधे खिसणी ठेऊन त्यात राताळी खिसून घ्यावीत. पाण्यात खिस ठेवल्याने काळा पडत नाही.
कढईत तुप गरम करून जी-याची फोडणी द्यावी आणि पिळून घेतलेला खिस, चिमुटभर साखर आणि मीठ घालावे. झाकणावर वाफेला पाणी ठेऊन मंद आचेवर शिजवून घ्यावे.
काही जण शेंगदाणेचा कुट देखील वापरतात.
सर्व्ह करताना दहीसोबत खायला उत्तम लागतो.
• उपवासाची बटाट्याची भाजी:
उपवासाची उकडलेल्या बटाट्याची भाजी:
१. आठ दहा मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
अर्ध्यावर कापून घ्या.
२. कुकरला बटाटे, पाणी व मीठ घालून पाच-सहा शिट्या काढून शिजवून घ्या. थंड झाल्यावर साले काढून घ्या. चिरा पाडून हवे तसे तुकडे करून घ्या.
३. वाटण: एक चमचा ओले खवलेले खोबरे+ दोन-तीन तिखट मिरच्या+ कढीपत्ता+ आल्याचा तुकडा हे एक दोन वेळा मिक्सरमध्ये भरड सारखे काढून घ्या. बारीक करू नका.
४. कढईत तेल गरम करा. जीरे, हिंग पावडर तडतडवा आणि लगेचच वाटणाची भरड तेलात घालून परतवा.
५. मीठ, चिमुटभर साखर आणि लिंबू रस पिळून मिक्स करा. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
आणि बटाटे घालून नीट परता. भाजी तय्यार. उपवासाच्या पु-यांसोबत उत्तम लागते.
• उपवासाच्या पु-या:
राजगिरा पीठ, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ समप्रमाणात घेऊन त्यात उकडलेले बटाटे, मीठ, बारीक चिरलेली मिरची, जीरे, कोथिंबीर टाकून अगदी चांगले मळून घ्या.
लहान गोळे करून, पु-या लाटून तळून घ्या. उत्तम फुलतात आणि चांगल्या लागतात.
• खमंग काकडी:
दोन गावठी काकड्या धुवून साले काढून घ्या. त्या धारदार सुरीने कोसून बारीक बारीक तुकड्यांमधे करून कापा. घट्ट पिळून पाणी काढून टाकावे.
बारीक काकडी, थंडगार घट्ट दही आणि शेंगदाणे भाजून बारीक केलेले कुट, बारीक चिरलेली मिरची व कोथिंबीर, मीठ आणि साखर सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करा.
तडकापात्रात तेल किंवा तूप गरम करा आणि हिंग पावडर व मोहरीचा टाका
मग काकडीच्या मिश्रणावर तडका द्या आणि मिक्स करा. खमंग काकडी तयार! :
• सुरणाचे काप:
आमच्या पट्ट्यात सुरण उपवासाला खातात. सुरणाचे काप करून त्याला मीठ, जीरा पावडर लावून तळतात आणि खातात. तुप किंवा तेल वापरू शकता.
• मुगडाळीची पेज:
आमच्या पट्ट्यात उकडलेले मुग किंवा मुगडाळ भिजवून पेज उपवासाला करूनही अनेक जण पितात.
बरेच सारे पदार्थ उपवासासाठी त्या त्या प्रांतानुसार ज्या गोष्टी वर्ज्य नाहीत त्यापासून बनवल्या जातात. सध्यापुरता इतकेच पदार्थ.
विठ्ठल, विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय रखुमाई!
रामकृष्ण हरी! पांडुरंग हरी! वासुदेव हरी!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!
– Food Memories Marinated with Love by, स्नेहा चौधरी- इंदूलकर