You are currently viewing आमरस मोदक आणि आप्पे

आमरस मोदक आणि आप्पे

संकष्टी चतुर्थी निमित्ताने घरोघरी आपण उकडीचे किंवा तळलेले मोदक बनवतोच. पण आंब्याच्या सिझनमधे आमरसयुक्त पिवळेधम्मक मोदक किंवा स्टाॅबेरी flavoured मोदक कधीतरी बदल म्हणून छान लागतात आणि अगदी घाईत असू तेव्हा सोप्या पध्दतीने झटपट बनतात. ह्यासाठी लहान मोदक साचा मात्र आवश्यक आहे.

खालील साहित्य वापरून बनवले:

– एक मोठी वाटी खवलेला शुभ्र नारळ

– एक मोठी वाटी आमरस {(हंगाम नसल्यास, किंवा ताजा आमरस नसेल तर Mango Pulp किंवा Strawberry pulp (stored and preserved)}

– अर्धी वाटी गुळ

– पाव चमचा वेलचीपूड

– अर्धी वाटी पेक्षा थोडे कमी साजूक तुप

– बारीक बेदाणे/मनूका आणि काजूचे तुकडे आवडत असल्यास

कढई मधे साजूक तुप मंद आचेवर हलकेच तापवायचे. मग खवलेले खोबरे नीट परतुन घ्यायचे. आमरस किंवा आवडता Pulp, गुळ, वेलचीपूड व आवडत असल्यास सुकामेव्याचे बारीक तुकडे असे सारे हलकेच परतुन घ्यायचे. गुळ वितळून मिश्रण साधारण एकजीव झाले की परातीत काढून, थोडेसे थंड होऊ द्यावे.

पण जरासे गरम असतानाच, मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात सारण भरून, मस्त पिवळसर मोदक बनतो.

आंब्याच्या पानांची किंवा केळीच्या पानाची सुरेख हिरवीगार गादी बनवून ताटात सजवून गणपतीबाप्पाला संकष्टी चतुर्थी निमित्ताने आमरस मोदकाचा नैवेद्य मनोभावे अर्पण करायचा. आणि आस्वाद घ्यायचा.

————————————————————–

हापुस आंब्याच्या गराचे आप्पे 🥭

– एक वाटी साधा रवा

– अर्धी वाटी ते पाऊण वाटी नारळाचे दुध

– पाव वाटी गोड आमरस

– मनुका (बेदाणे)

– काजूचे बारीक तुकडे

– अर्धी वाटी गुळ चिरलेला गुळ

– चिमुटभर मीठ

– पाव चमचा वेलची पावडर

– साजूक तूप

नारळाच्या दुधात चिरलेला गुळ विरघळवून घ्यायचा. नंतर एक वाटी साधा रवा, अर्ध्या वाटी दुध-नारळाच्या दुधात ५-६ तासांसाठी भिजवून ठेवायचे. भिजवतानाच त्यात काजू तुकडे आणि मनुका (बेदाणे) घालून ठेवतो आम्ही.

६ तासानंतर फुलुन आलेल्या रव्यामधे वेलचीपूड, आमरस आणि चिमुटभर मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. छान पिवळसर रंग आला असेल.

आप्पेपात्र गरम करून, साजूक तूप घालून ह्या मिश्रणाचे आप्पे तळून घ्यायचे. आवडत असल्यास थोडे खरपुस करायचे. छानच लागतात!

– Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर

#आप्पे#मोदक#संकष्टी#modak#sankashti#mango

+7

Leave a Reply