You are currently viewing व्हेज कोल्हापूरी‌ Red gravy premix

व्हेज कोल्हापूरी‌ Red gravy premix

रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज प्रिमिक्सेस म्हणजे सोप्या भाषेत आपण हाॅटेल ला गेल्यावर ज्या चमचमीत, चटकदार आणि सुवासिक अशा पंजाबी भाज्या खातो, त्यापध्दतीच्या भाज्या व बिर्याणी झटपट बनवता येतील असे तयार मसाले. आपण सात ग्रेव्हीज प्रिमिक्स कसे बनवायचे ते बघणार आहोत.

बहुदा शाकाहारी पंजाबी भाज्यांसाठी हे पंजाबी ग्रेव्ही प्रिमिक्स वापरले जातात. Dehydrated powders म्हणजेच बाष्प काढण्यासाठी उन्हात किंवा Dryer machine मधे सुकवलेल्या कांदा, लसूण, दुध, आंबा, आले, टाॅमेटोच्या आणि अशा प्रकारच्या पावडरी ह्यामधे वापरल्या जातात. तेलात परतून फ्लेवर्स आणि झायका वाढवणारे सात अख्खे मसाले ह्यात वापरले जातात. तीळ, खसखस सारखे पदार्थ थोडेसे भाजून पावडर करून वापरले कि घट्टपणा येतो तर मैदा किंवा काॅर्नफ्लाॅर वापरला जातो. काजू, मगज मस्त creamy and rich texture gravy व्हायला मदत करतात.

हवामान थंड असल्यास डब्यात भरून बाहेर ठेवल्यास देखील दोन-तीन महिने किंवा जास्त टिकतात. पण भारतीय सरासरी हवामानानुसार फ्रिजमधे ठेवणे उत्तम. सहा सात महिने व्यवस्थित टिकतील.

थोड्याश्या शिजवलेल्या, अर्धकच्च्या भाज्या आपण प्रिमिक्सेस सोबत वापरतो. नैसर्गिक रंग आणि संरक्षक वापरायची गरज नसते. प्रमाणे अगदी योग्य असावीत म्हणून टेबलस्पून (tbsp) आणि टिस्पून (tsp) साठी अगदी योग्य मापे असलेले चमचे वापरा.

रेड/ लालसर ग्रेव्हीसाठीचे प्रिमिक्स

चवीला तिखट आणि लालसर रंगाची ग्रेव्ही

१. काजू १० ग्रॅम (1 tbsp)

२. दुध पावडर २० ग्रॅम (२ tbsp)

३. मगजसरी १० ग्रॅम (१ tbsp)

४. तंदूरी मसाला‌ (१ tsp)

५. चाट मसाला (१ tsp)

६. लसूण पावडर (१ tsp)

७. कांदा पावडर (२ tsp)

८. कसूरी मेथी (१ tsp)

९. मीठ (१ tsp)

१०. पीठीसाखर (१/२ tsp)

११. मक्याचे पीठ किंवा मैदा (१ tsp)

१२. तेल (२ tbsp)

१३. काळे मिरे पावडर (१/२ tsp)

१४. सफेद तीळ (१ tbsp)

१५. सेलम हळद पावडर (१/२ tsp)

१६. काश्मिरी किंवा थोडे अधिक तिखट हवे असल्यास बेडगी मिरची पावडर (२ tsp)

१७. धणा पावडर (१ tsp)

१८. सुंठ पावडर (१ tsp)

१९. गरम मसाला (१ tsp)

२०. ७ खास अख्खे मसाले (१ तमालपत्र, १ दालचिनी तुकडा, १ काळी मसाला वेलची, १ बादियान, २ हिरवी वेलची, २ लवंग, ४-५ काळेमिरे)

साहित्य जमवून झाले आता प्रिमिक्स बनवूयात.

१. एका पॅनमधे काजू, मगजसरी आणि तीळ हलकेच भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पावडर करा.

२. एक भांडे घेऊन त्यात दिलेल्या प्रमाणानुसार दुध पावडर, काळे मिरे पावडर, काजू-मगजसरी पावडर, किचनकिंग मसाला, चाट मसाला, काश्मिरी मिरची पावडर, धणा पावडर, सुंठ पावडर, तंदूरी मसाला, हळद पावडर, लसूण पावडर, कांदा पावडर, कसूरी मेथी, मीठ, पीठीसाखर, मैदा किंवा मक्याचे पीठ हे सर्व घालून एकदम एकजीव मिसळून घ्या.

३. पॅन गरम करून त्यात २ tbsp तेल गरम करा आणि सात खास अख्खे मसाले, म्हणजेच १ तमालपत्र, १ दालचिनी तुकडा, १ काळी मसाला वेलची, १ बादियान, २ हिरवी वेलची, २ लवंग, ४-५ काळेमिरे एक ते दोन मिनिटे न करपवता परतून घ्या. रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज सुगंधित करण्यासाठी ह्याचा खास वापर होतो. परतलेले हे सर्व अख्खे मसाले तेलासकट आपण मिक्स केलेल्या पावडर मधे घालावे व मस्त मिक्स करावे. आणि चांगल्या डब्यामधे भरून शक्यतो फ्रिजमधे ठेवावे.

तिखटसर असे रेड ग्रेव्ही प्रिमिक्स वापरून आपण व्हेज कोल्हापुरी बनवुयात. 🙂

साहित्य:

१. अर्धे रेड ग्रेव्ही प्रिमिक्स पॅक

२. एक‌ ते दोन मिरचीचा खर्डा

३. एका मध्यम टाॅमेटोची प्युरी

४. १०० ग्रॅम पनीर चौकोनी कापलेले

५. एक वाटी मटार

६. अर्धी वाटी फ्लाॅवर

७. अर्धी वाटी चौकोनी कापलेले गाजर

८. १०-१२ फरसबी मध्यम कापून

९. २ भोपळी मिरची चौकोनी कापून

१०. एक मोठा कांदा मोठ्या आकारात कापलेला

११. ७-८ मशरूम उभे चिरून

१२. कोथिंबीर बारीक चिरून

कृती पाहुयात:

१. वर दिलेल्या प्रमाणातील रेड ग्रेव्हीचे अर्धे तयार प्रिमिक्स घेऊन त्यात अर्धा कप दुध आणि अर्धा कप पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत असे नीट मिक्स करून बाजूला ठेवावे.

(Please note: आपण बनवलेले प्रिमिक्स वापरून सहा ते सात जणांना पुरेल इतपत भाजी होते. तुम्ही सहा सात जण असाल तर पुर्ण प्रमाण वापरा आणि दुध आणि पाणी मिश्रणदेखील फक्त एक कप प्रत्येकी आणि भाज्यांचे प्रमाण दुप्पट.)

२. पॅनमधे थोड्याशा तेलावर पनीर तुकडे हलकेच परतून जरा ब्राऊनीश करा. आणि काढून ठेवा.

३. नंतर अगदी एक मिनिटासाठी कांदा आणि भोपळी मिरची परता.

४. बाकीच्या सर्व भाज्या अर्धकच्च्या शिजवून घ्या.

५. आता पॅनमधे थोडेसे तेल घालून त्यात मिरचीचा खर्डा टाकून परतून घ्या.

६. टाॅमेटो प्युरी घालून ३-४ मिनिटे ती व्यवस्थित शिजू द्या.

७. बाजूला ठेऊन दिलेले प्रिमिक्सचे दुध-पाण्यातले मिश्रण पॅनमधे ओता आणि एकजीव करा. आणि १०-१५ मिनिटे शिजवा. मधेमधे चमच्याने ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

८. आता सर्व अर्धकच्च्या शिजवलेल्या भाज्या ह्यात टाकून परतून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्या. सतत अलगद परतत रहा. चव घेऊन पहा. हवे असल्यास मीठ टाका.

९. पनीर आणि भोपळी मिरची सगळ्यात शेवटी घाला आणि पाच मिनिटे परतून गॅस बंद करा.

तुमची व्हेज कोल्हापुरी तय्यार! हवे तर कोथिंबीर भुरभुरून गार्निश करा.

गरमागरम नान, पराठा, चपाती किंवा वाफाळत्या जीरा राईस सोबत आस्वाद घ्या.

हेच प्रिमिक्स वापरून तुम्ही तिखट असा कोफ्ता, व्हेज हंडी,पनीर बटर मसाला बनवू शकता.

#red_gravy#red_gravy_premix#restaurant_style_gravies#instant_gravies#laxmi_masale#the_masala_bazaar

Leave a Reply